Sangli News : झेडपी शाळेतील पाचवीच्या पोरांचे वर्गातील दोस्तासाठी कायपण! कोणाला कळूही न देता आजारपणात केली मदत
Sangli News : मदतीची भावना प्रबळ असेल, तर वयाचे बंधन नसते हेच सांगत पाचवीच्या मुलांनी वर्गमित्र आजारी असल्याचे समजताच कोणाला कळूही न देता मदत करून त्याला उपचार करण्यासाठी आर्थिक मदत केली.
Sangli News : मित्रत्वाची व्याख्या काय असते हे अधोरेखित करणारी घटना सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली. मदतीची भावना प्रबळ असेल, तर वयाचे बंधन नसते हेच सांगत पाचवीच्या मुलांनी वर्गमित्र आजारी असल्याचे समजताच कोणाला कळूही न देता मदत करून त्याला उपचार करण्यासाठी आर्थिक मदत केली. नागाव कवठे (ता. तासगाव, जि. सांगली) (Nagaon Kavathe zp school sangli) येथील प्राथमिक शाळेतील पाचवीच्या मुलांनी केलेल्या मदतीची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.
नेमका प्रसंग काय घडला?
नागाव कवठेच्या प्राथमिक शाळेतील एका गरीब विद्यार्थ्याच्या अंगावर पुरळ उठले होते. त्याची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने त्याला औषध आणण्यासाठी पैसे नव्हते. त्याचा या गोष्टीचा विचार करून त्याच्या 8 ते 10 मित्रांनी त्याला औषध आणून द्यायचं ठरवलं. घरातून खाऊ खाण्यासाठी पैसे मागून आणायचे आणि त्याच पैशातून औषध आणून त्या मित्राला द्यायचे असा संकल्प त्यांनी केला.
जमा झालेल्या पैशातून त्यांनी मित्रासाठी मेडिकलमध्ये जाऊन औषधाची बाटली आणली. विशेष म्हणजे ही गोष्ट त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी किंवा त्यांच्या शिक्षकांना सुद्धा सांगितली नव्हती. ही माहिती एका मुलाने 15 दिवसांनी सांगितल्यानंतर चिमुकल्यांची दातृत्वाची माहिती समोर आली. विशेष म्हणजे त्या मुलाच्या अंगावरील डाग कमी झाले आहेत. त्यामुळे किलोची मदत करून टनाची जाहिरात करणाऱ्या थोताडांना या चिमुकल्यांच्या दातृत्वाने चांगलीच चपराक दिली आहे.
पाचवीच्या वर्गातील हर्षवर्धन सुर्यवंशी, अर्णव साळुंखे, तेजस कांबळे, शिवरत्न पाटील, सनी शिरतोडे, साहील पाटील, ओम वाघमोडे, राजवर्धन सुर्यवंशी, आयान मुल्लाणी, हर्षवर्धन कांबळे, पार्श्व रुईकर, रुद्रप्रताप सुर्यवंशी, वरद पाटील, सोहम सुतार या चिमुकल्या हातांनी दातृत्वाला नव्या उंचीवर नेताना समाजाला आरसा दाखवला आहे. (Nagaon Kavathe zp school sangli)
डाॅ. संदीप पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना बक्षीस
नागाव कवठे येथील केमिस्ट्री विषयात पीएच. डी. प्राप्त केलेल्या डॉ. संदीप पाटील यांनी त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना 101 रुपयांचे बक्षीस दिले व संबंधित गरजू विद्यार्थ्याला 1001 रुपयांची आर्थिक मदत केली. मुलांनी केलेल्या मदतीचा विषय सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या