संजयकाका पाटील पुन्हा भाजपमध्ये परतणार? विशाल पाटलांना दिलेल्या ऑफरवरही चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले!
Chandrakant Patil on Sanjaykaka Patil and Vishal Patil : संजयकाका पाटील पुन्हा भाजपमध्ये परतण्याच्या चर्चेवर आणि विशाल पाटलांना दिलेल्या ऑफरवर चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Chandrakant Patil on Sanjaykaka Patil and Vishal Patil : माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) पुन्हा भाजपमध्ये परतण्याच्या चर्चेवर आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांना दिलेल्या ऑफरवर मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
माजी खासदार संजयकाका पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे संजयकाका पाटील यांचे पुनर्वसन अजित पवारांनी (Ajit Pawar) करायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तर विशाल पाटील अपक्ष खासदार असल्याने त्यांनी भाजपमध्ये (BJP) सहयोगी व्हावे, असे आमचा प्रयत्न होता आणि तो चालूच राहणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संजयकाका पाटलांच्या पुनर्वसनात मी अजितदादांना मदत करणार
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजयकाका पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची साथ सोडून थेट त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. आर.आर. पाटलांचे पुत्र रोहित पाटील यांनी त्यांचा पराभव केला. आता संजयकाका पाटील पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याच्या चर्चा सांगलीच्या राजकारणात जोर धरू लागल्या आहेत. याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, माजी खासदार संजयकाका पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे संजयकाका पाटील यांचे पुनर्वसन अजित पवारांनी करायचे आहे. संजयकाका पाटील आमचे जुने मित्र असल्याने त्यांच्या पुनर्वसनामध्ये मी अजित पवारांना मदत करणार, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
विशाल पाटलांना केवळ ऑफर
तर सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील सध्या चांगलेच चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांनी, "भविष्यात मी काँग्रेससोबत नाही तर इतर कोणत्या पक्षात सामील होईन आणि मलाही मंत्रिपद मिळेल," असे वक्तव्य केले होते. या विधानानंतर, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भाजपमध्ये येण्यासाठी ऑफर दिल्याची जोरदार चर्चा रंगली होती. यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होता. मात्र, या चर्चांना उत्तर देताना विशाल पाटील यांनी "मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे आणि पुढील पाच वर्षे अपक्ष म्हणूनच काम करणार आहे, असे म्हटले. त्यांच्या या स्पष्टोक्तीमुळे काँग्रेसला तात्पुरता दिलासा मिळाला असून विशाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना सध्या तरी ब्रेक लागल्याचे चित्र आहे. आता याबाबत चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय. खासदार विशाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा विषय कधीच नव्हता, त्यांना केवळ ऑफर होती. विशाल पाटील अपक्ष खासदार असल्याने त्यांनी भाजपमध्ये सहयोगी व्हावे, असा आमचा प्रयत्न होता आणि तो सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा
























