(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Municipal Corporation Robot : सांगली महापालिकेत ड्रेनेज स्वच्छतेसाठी रोबो अवतरणार; कर्मचाऱ्यांकडून केले जाणारे काम 15 मिनिटात होणार
Sangli Municipal Corporation Robot : खोल ड्रेनेज चेंबरमधील गाळ काढणारा अत्याधुनिक रोबो लवकरच सांगली महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. या अत्याधुनिक रोबोची तीन ठिकाणी यशस्वी चाचणीही घेण्यात आली.
Sangli Municipal Corporation Robot : खोल ड्रेनेज चेंबरमधील गाळ काढणे हे सगळ्याच महापालिका किंवा यंत्रणांसमोर नेहमी एक मोठे आव्हान असते. ड्रेनेजमधील गाळ काढण्यासाठी कामगार त्या ड्रेनेजमध्ये उतरावे लागतात आणि यात दुर्घटना घडल्याच्या आणि कामगारांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना झाल्या आहेत. सांगली महापालिकेसमोर देखील हीच अडचण होती. त्यामुळे सांगली महापालिकेत ड्रेनेज स्वच्छतेसाठी अत्याधुनिक रोबो लवकरच सांगली महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्व योजनेतून रोबो खरेदीचा 39 लाख 52 हजाराचा प्रस्ताव पाठवला आहे.
खोल ड्रेनेज चेंबरमधील गाळ काढणारा अत्याधुनिक रोबो लवकरच महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. या अत्याधुनिक रोबोची तीन ठिकाणी यशस्वी चाचणीही घेण्यात आली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत ही चाचणी झाली. चाचणीत अवघ्या १५ मिनिटात या रोबोने ड्रेनेज चेंबरमधील गाळ काढला. त्यामुळे सांगली महापालिका क्षेत्रात लवकरच ड्रेनेजमध्ये गाळ काढताना रोबो दिसून येणार आहे.
पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सूचित केल्याप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मान्यतेने रोबो खरेदीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ड्रेनेजलाइन साफ करून त्यातील गाळ काढण्याचे काम मनपाच्या ड्रेनेज विभागाचे कर्मचारी करतात. महानगरपालिका क्षेत्रात शहरी भागात अनेक ठिकाणी भुयारी ड्रेनेज आहेत. अनेक ठिकाणी चेंबरची खोली 5 ते 10 मीटर पर्यंत असते. त्यामुळे कर्मचारी चेंबरमध्ये उतरल्यानंतर आतील गॅसमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते.
त्यामुळे खोल ड्रेनेज चेंबरमधील गाळ हा अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून काढण्याबाबत निर्णय घेण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्व योजनेतून यंत्रमानव खरेदीचा 39 लाख 52 हजाराचा प्रस्ताव पाठवला आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली. हा यंत्रमानव केरळ येथील बॅडिकोट कंपनीकडून तयार करण्यात आला. रोबोटच्या आर्ममध्ये सेन्सर आहे तसेच कॅमेराही असल्याने कॅमेराच्या माध्यमातून चेंबरमधील गाळ आणि चेंबरची स्थिती पाहता येणार आहे. तसेच दुर्घटनेचा धोका टाळण्यास मदत होणार आहे.
असा काम करणार रोबोट
हा रोबोट जनरेटर जनरेटरवर चालतो. फक्त दोन व्यक्ती हा रोबोट चालवू शकतात .आर्म चेंबरमध्ये या रोबोटचा सेन्सर आहे. त्याशिवाय कॅमेराही असल्याने चेंबरमधील गाळ आणि चेंबरची स्थिती पाहता येऊ शकते. त्यामुळे आर्म चेंबरमध्ये गेल्यावर ड्रेनेजमधील गाळ स्वच्छ करण्यास मदत होणार आहे. या रोबोमुळे कर्मचाऱ्यांकडून केले जाणारे काम 15 मिनिटात केले जाणार असून महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची दुर्घटना यामध्ये घडणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या