महाडमध्ये सावित्रीचं रौद्ररुप, काळ नदीवरील पूल गेला वाहून; प्रशासन अलर्ट, NDRF तैनात, आमदारांकडून पाहणी
रायगडमधील महाड पोलादपूर परिसरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. डोंगर माथ्यावरती जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे महाडमध्ये सावित्री नदीतने धोक्याची पातळी ओलांडली आहे
रायगड : राज्यात पावसाने हाहाकार उडवला असून मुंबई, पुण्यासह कोकणातही मुसळधार पाऊस (Rain) पडत आहे. जोरदार पावसामुळे नद्या दुथड्या भरुन वाहत आहेत. कोकणाती काही नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडली असून धरणांतून विसर्गही करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत 83 टक्के वाढ झाली असून धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 6 गेट मधून 3.35 घमी/से एवढा पाण्याचा विसर्ग करम्यात आला आहे. तर, नदी पात्रात पाण्याची वाढ झाल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दुसरीकडे सावित्री (Savitri river) नदीनेही रौद्ररुप धारण केलं असून पाण्याने पुलाची पातळी गाठल्याचं पाहायला मिळत आहे.
रायगडमधील महाड पोलादपूर परिसरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. डोंगर माथ्यावरती जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे महाडमध्ये सावित्री नदीतने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बुधवारी गांधारी नदी देखील दुथडी भरुन वाहत होती, महाडमधील बिरवाडी भागातील कुंभारवाडा परिसरामध्ये रस्त्यावरती पाणी साचल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. महाडमध्ये सावित्री नदिने रौद्ररुप धारण केल्याने महाडमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे, प्रशासनालाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाडमधील नदी किनारी भाग पुराच्या विळख्यात असून शहरात एनडीआरएफची टीम तैनात आहे. दरम्यान, शहरांतील दुकानदारांची हळूहळू स्थळांतरकडे वाटचाल होताना दिसून येत आहे. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेत महाड शहरातील अनेक भागात पाहणी केली. त्यांच्यासोबत महाडचे प्रांताधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी देखील उपस्थित होते.
काळ नदीवरील पुल गेला वाहून
दरम्यान, आमदार भरत गोगावले हे मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या आढावा बैठकीसाठी येथून रवाना झाले आहेत. महाड मधील संभाव्य परिस्थितीचा आढावा घेत आमदार गोगावले यांनी प्रशासनाला अनेक आपत्कालीन परिस्थिती मधील उपाय योजनेच्या सूचना केलेल्या आहेत. महाड तालुक्यामध्ये काल सायंकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामध्ये महाड शहर तसेच बिरवाडी शहरांमध्ये पुराचे पाणी काही भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. तालुक्यातील सावित्री व काळ नदीसह छोट मोठ्या ओढ्यानी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सह्याद्रीवाडी येथील कसबेशिवथरला जोडणारा काळ नदीवरचा पुल देखील पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे, सह्याद्रीवाडी गावाचा संपर्क तुटला आहे..
दरम्यान, आज सकाळपासून पुणे, मुंबई आणि उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली असून जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती आहे. पुण्यातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झालं असून पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला आहे. त्यानंतर, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत पुण्यातील पावसासंदर्भात अपडेट दिली. मात्र, आज पहिल्यांदाच पुणे पावसाच्या पाण्याने धुवून निघाल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा
पक्षप्रवेश होताच मुख्यमंत्री शिंदेंचा दावा, परभणीतील 'पाथरी' मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार?