Raigad Accident: सहलीसाठी गेलेल्या मुंबईतील खासगी क्लासच्या बसचा बोरघाटात अपघात, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
Pune Expressway Accident: मावळवरुन मुबईच्या दिशेने निघालेल्या या बसचा अपघात झाला असून त्यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 35 विद्यार्थी जखमी झाले आहेत.
रायगड: पुणे एक्सप्रेस-वेवर (Pune Expressway Accident) बोरघाटात खाजगी आराम बस पलटी झाल्याने अपघात झाला आहे. या अपघातात एक विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तसेच 35 विद्यार्थी यामध्ये जखमी असल्याची माहिती असून त्यांच्यावर खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हितिका खन्ना आणि राज म्हात्रे अशी मृत झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत.
मुंबईतील चेंबूर येथील मयांक ट्युटोरिअल्स या खाजगी क्लासच्या विद्यार्थ्यांची सहल मावळ येथील वेट अँड जॉय या थीमपार्कला गेली होती. रविवारी रात्री आठच्या सुमारास मुंबईकडे परतत असताना बोरघाटातील मॅजिक पॉईंटजवळ या खाजगी बसला अपघात होऊन पलटी झाली. या अपघातात त्यामधील सर्वच विद्यार्थी जखमी झाले. त्यामधील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत 35 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांवर खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
मावळ येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या खासगी बसचा हा अपघात झाला आहे. खाजगी क्लासेसच्या 48 विद्यार्थ्यांना घेऊन ही बस सहलीसाठी गेली होती.
सहल घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अपघाताची रायगडची ही आजची दुसरी बातमी आहे. त्या आधी आज दुपारी परभणीत एका शैक्षणिक सहल घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला होता. त्यामध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
परभणीत विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात
परभणीच्या गंगाखेड-राणीसावरगाव रस्त्यावरील (Parbhani-GangaKhed Road) खंडाळी पाटीवर शैक्षणिक सहल घेऊन जाणारी बस आणि एसटीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 22 जण जखमी झाले असून यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्वांवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गंगाखेड येथील संत जनाबाई विद्यालयाची (Parbhani Gangakhed Sant Janabai Vidyalaya) शैक्षणिक सहल घेऊन जाणारी स्कूल बस चाकूरकडे जात होती. याच वेळी अहमदपूर येथून बुलढाण्याच्या जाणारी बस गंगाखेड-राणीसावरगाव रस्त्यावरील खंडाळी पाटीवर आली असता दोन्ही बसची समोरासमोरच धडक झाली. ज्यात दोन्ही बसमधील 22 जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती कळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींना बाहेर काढून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
ही बातमी वाचा: