Pen Urban Bank Scam : पेण अर्बन बँक घोटाळ्याला 12 वर्षे पूर्ण, संघर्ष समितीतर्फे बँक बुडव्या घोटाळेबाजांचे श्राद्ध
Pen Urban Bank Scam : पेण अर्बन बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समितीतर्फे बँक बुडव्या घोटाळेबाजांचे श्राद्ध घालण्यात आले. 23 सप्टेंबर रोजी 12 वर्षे पूर्ण झाल्याने बँकेच्या आवारातच घोटाळेबाजांचे श्राद्ध घातले.
Pen Urban Bank Scam : रायगड (Raigad) जिल्ह्यातील पेण अर्बन बँकेतील 758 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी प्रमुख आरोपीमुळे गेल्या 12 वर्षांपासून लाखो खातेदारांचे पैसे बुडाले आहेत. यामुळे, पेण संघर्ष समितीमार्फत या घोटाळ्यातील प्रमुख आरोपींचे श्राद्ध घालण्यात आले.
गेल्या 12 वर्षांपूर्वी पेण अर्बन बँकेने केलेल्या घोटाळ्यामुळे मुंबई, रायगड जिल्ह्यातील खातेदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. यामुळे, बँकेच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करुन घोटाळेबाजांना अटक करण्यात आली होती. तर, बँकेने केलेल्या 758 कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे सुमारे एक लाख 98 हजार खातेदारांना आर्थिक फटका बसला आहे.
दरम्यान, आज 23 सप्टेंबर रोजी पेण अर्बन बँकेच्या घोटाळ्याला 12 वर्षे पूर्ण झाले असून सुमारे 500 खातेदारांचा मृत्यू झाला आहे. यामुळे, पेण अर्बन बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समितीमार्फत बँक बुडव्या प्रमुख घोटाळेबाजांचे आज बँकेच्या आवारातच श्राद्ध घालण्यात आले. यावेळी, या घोटाळ्यातील मुख्य आरोपी शिशिर धारकर यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर, संतप्त खातेदारांना शिशिर धारकर यांच्या फोटोला चपलेने मारुन त्यांचा फोटो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, गेल्या 12 वर्षात अवघ्या 65 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून सुमारे 1 लाख 60 हजार खातेदारांचे पैसे आजही घोटाळ्यात अडकले आहेत. तर, जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे संरक्षण होणे गरजेचे असून त्यांचे व्यवहार होत असल्याने सरकारने नियंत्रण करणे गरजेचे आहे.
काय आहे पेण अर्बन बँकेचा घोटाळा?
सप्टेंबर 2010 मध्ये पेण अर्बन बँकेतील सुमारे 758 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. शिशिर धारकर यांनी बँकेचे अध्यक्ष, तज्ज्ञ संचालक, संचालकपदे भूषविली आहेत. शिशिर धारकर यांनी सहा कंपन्या बनवून मेटल स्क्रॅप ट्रेडिंग कॉर्पोरेशनकडून 480 कोटी रुपये कर्ज घेतले होते. ते कर्ज 170 दिवसांत फेडायचे असते. परंतु ते कर्ज न फेडल्याने सीबीआय चौकशी झाली व बँकेचा घोटाळा समोर आला.
या प्रकरणात राजकीय दबावामुळे सुरुवातीला गुन्हा दाखल होत नव्हता. त्यामुळे ठेवीदार आणि खातेदार यांच्यात प्रखर असंतोष होता. अखेर ठेवीदारांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर 2011 मध्ये सहकार विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बँकेच्या आजी-माजी संचालक, ऑडिटर अशा 43 जणांना अटक करण्यात आली होती. शिवाय ईडीने बँकेच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या होत्या.
दुसरीकडे पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणाचा खटला ईडी न्यायालयाकडे वर्ग करण्याचे आदेश अलिबागच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत. परंतु या निर्णयाने ठेवीदारांना मालमत्ता विकून पैसे मिळण्यातील प्रक्रिया लांबली आहे.