घोषणाबाजी, जल्लोष अन् कार्यकर्त्यांचा उत्साह! अनंत गीतेंनी भरला उमेदवारी अर्ज; तटकरेंना आव्हान!
अनंत गीते यांनी आज शक्तिप्रर्शन करून मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई : लोकसभा (Loksabha Election 2024)निवडणुकीमुळे राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार संपूर्ण ताकदीनिशी आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. या लोकसभा निवडणुकीत रायगड (Raigad) लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे विशेष लक्ष आहे. कारण या जागेवर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे (Sunil Tatkare) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे (Shivsena) अनंत गीते (Anant Geete) यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान, अंतत गीते यांनी आज ( 15 एप्रिल) मोठे शक्तिप्रदर्श करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
गीतेंच्या शक्तिप्रदर्शनाला बड्या नेत्यांची उपस्थिती
गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा, त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपला अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी सकाळी 11 वाजेनंतर आपल्या समर्थकांसह रॅली काढली. या रॅलीला अलिबागच्या शेतकरी भवनापासून सुरुवात झाली. यावेळी ठाकरे गटाचे भास्कर जाधव, अनिल तटकरे, शेकापचे जयंत पाटील, माजी आमदार संजय कदम, उल्का महाजन आदी नेते उपस्थित होते. गीते यांच्या शक्तीप्रदर्शनात हे नेते मोठ्या उत्साहाने सामील झाले होते.
गीते यांनी दाखल केला उमेवारी अर्ज
या रॅलीदरम्यान गीते यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर काँग्रेसेचे नेते मधुकर ठाकूर यांच्या घरी जाऊन ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. पुढे त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
तटकरे यांच्याकडून गीते झाले होते पराभूत
रायगड लोकसभा जागेसाठी एकूण तीन उमेदवारांत प्रमुख लढत होणार आहे. पण यातही प्रमुख लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होण्याची शक्यता आहे. रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी गेल्या निवडणुकीत अनंत गिते यांना 31000 मतांनी धूळ चारली होती. यावेळीदेखील गीते आणि तटकरे यांच्यातच लढत होणार आहे.
वंचितनेही दिला उमेदवार, कोण जिंकणार?
दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही या जागेवर आपला उमेदवार दिला आहेत. त्यांनी येथून मराठा समाजूतन येणाऱ्या कुमुदिनी चव्हाण यांना तिकीट दिले आहे. त्यादेखील येथे मोठ्या ताकदीने प्रचार करत आहे. या निवडणुकीत माझाच विजय होणार, असा दावा त्या करत आहेत. तर दुसरीकडे गीतेदेखील मी यावेळी तटकरे यांना धूळ चारणार, असा विश्वास व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे या जागेवर कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
डोळे नाहीत, दिसत नाही, शिक्षणासाठी खाल्ल्या खस्ता; आज उभी केली 500 कोटींची कंपनी; कोण आहेत श्रीकांत बोला?