(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Khalapur Irshalwadi Landslide : सध्या बचाव कार्याला प्राधान्य, दोन हेलिकॉप्टर तयार, पण खराब हवामानामुळं टेकऑफ अशक्य : मुख्यमंत्री
Khalapur Irshalwadi Landslide : हवाई मार्गानं बचावकार्य करण्याचा पर्याय विचारधीन आहे. दोन हेलिकॉप्टर तयार आहेत, मात्र खराब हवामानामुळे टेकऑफ करणं शक्य नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
Khalapur Irshalwadi Landslide : रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडलीये. दरडीखाली 30 ते 40 घरं दबल्याचा अंदाज. हा आदिवासी पाडा असून यथे साधारण 205 लोकं राहातात असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर आतापर्यंत 80 जणांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्वतः मुख्यमंत्री घटनास्थळी रवाना झाले. सध्या मुख्यमंत्री घटनास्थळी असून परिस्थितीचा आढावा घेत आहे. मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधून सर्व परिस्थितीची माहिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, "रायगडमधील इर्शाळवाडी आहे. या वाडीत जवळपास 45 ते 47 घरं आहेत. दरड कोसळल्यामुळे जवळपास 16 ते 17 घरं मलब्याखाली गाडली गेली आहेत. आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. NDRF, TDRF आणि स्थानिक रेस्क्यू टीम काम करत आहेत."
"बचाव कार्य करत असताना अनेक अडथळे येत आहेत. वरती गाडी जाण्याची किंवा इतर साधनं नेण्याची सुविधा नाही. कारण रस्ताच नाहीये. त्यामुळे सगळं काम बचाव पथकातील जवानांनाच करावं लागणार आहे. सध्या प्राधान्यानं बचावकार्य सुरू आहे. 15 ते 17 घरं मातीच्या घराखाली आहेत. रात्री दरड कोसळल्याचा आवाज झाल्यानंतर लोकं घाबरून घरातून बाहेर पडली आणि पायथ्याशी आली. त्यामुळे सध्या संपूर्ण आकडा समोर आलेला नाही. परंतु, 15 ते 20 लोकं आणखी ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे.", असं मुख्यमंत्री म्हणाले.
हवाई मार्गानं बचावकार्य करण्याचा पर्याय विचारधीन आहे. दोन हेलिकॉप्टर तयार आहेत, मात्र खराब हवामानामुळे टेकऑफ करणं शक्य नाही. हवाई दलाशी सातत्यानं संपर्कात आहोत. सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन ज्या-ज्या पद्धतीनं शक्य आहे. त्या-त्या पद्धतीनं बचावकार्य केलं जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
पाहा व्हिडीओ : CM Eknath Shinde On Irshalwadi Landslide : 2 हेलिकॉप्टर तयार पण खराब हवामानामुळे अडथळा
दरम्यान, इर्शाळवाडी हा आदिवासी पाडा असून डोंगराच्या उतारावर आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, दादा भुसे तातडीने दुर्घटनास्थळी दाखल झाले. एनडीआरएफची टीमही दुर्घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्यास सुरुवात करण्यात आली आहे. बचाव कार्य जलद गतीनं होण्यासाठी हायवेपासून आतील रस्ता पोलिसांकडून बंद ठेवण्यात आला आहे. रेस्क्यूसाठी पनवेल महापालिकेचे कर्मचारीही दाखल झाले आहेत. पावसामुळे माती निसरडी झाल्यानं वाडीपर्यंत पोहोचण्यास मदत पथकाला खूप कष्ट घ्यावे लागत आहेत. सकाळी उजेडात मदत आणि बचावकार्य जोमानं सुरु केलं जाणार आहे.