Raigad News : पाण्यात पोहण्याचा मोह जिवावर बेतला; मुरुडमधील फणसाड डॅममध्ये मुंबईतील युवक बुडाला; अथक प्रयत्नानंतर बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढला
Raigad News : रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील फणसाड डॅममध्ये एक तरुण बुडाल्याची घटना घडलीय. मुंबईच्या अंधेरी येथून फिरण्यासाठी आलेल्या 11 युवकांच्या गटातील एक युवक पोहताना बुडाला.

Raigad News : रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील फणसाड डॅममध्ये एक तरुण बुडाल्याची घटना घडलीय. मुंबईच्या अंधेरी येथून फिरण्यासाठी आलेल्या 11 युवकांच्या गटातील एक युवक पोहताना बुडाला. साहिल राजू रणदिवे अस बुडालेल्या तरुणाच नाव असून तो 24 वर्षांचा आहे. ही घटना मुरूडमधील बोरली गावाच्या हद्दीत घडली असून या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला (SVRSS) दिल्यानंतर, त्यांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. यावेळी त्यांनी तब्बल 38 फूट खोल असलेल्या या डॅममध्ये बुडालेल्या युवकाचा मृतदेह 'फ्री स्टाईल डायव्हिंग' पद्धतीने शोधून बाहेर काढण्यात आला. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. मात्र पावसाळी पर्यटन करत असताना परिसराचा आणि पाण्याचा अंदाज नसताना पाण्यात उतरण पुन्हा एकदा एका तरुणाच्या जिवावर बेतल्याचे समोर आलं आहे.
कामवारी नदीत 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू, दोन दिवसांच्या शोधानंतर मृतदेह आढळला
भिवंडी तालुक्यातील शेलार परिसरातील कामवारी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय सूरज तिवारी या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला सूरज अखेर नदीत मृतावस्थेत सापडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, सूरज तिवारी (वय 14) हा दोन दिवसांपूर्वी ट्युशनला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. अखेर तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस तपासात उघड झालं की, सूरज आपल्या तीन मित्रांसोबत कामवारी नदीत पोहायला गेला होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे सूरज बुडाला. ही घटना पाहून घाबरलेल्या मित्रांनी कोणालाही काही न सांगता तेथून पलायन केले.
दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांच्या चौकशीनंतर मित्रांनी खरी घटना सांगितली. त्यानंतर कुटुंबीय आणि अग्निशमन दलाने शोधमोहीम सुरू केली. तब्बल 48 तासांच्या शोधानंतर सूरजचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळून आला. मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा करत शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास भिवंडी तालुका पोलीस करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या


















