(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune : विद्यार्थ्यांसमोरच शिक्षकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी ! पालक संतापले; इंदापुरातील व्हिडीओ व्हायरल
School Teacher Fight Video At Indapur: इंदापूर तालुक्यातील चाकाटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपापसात हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
School Teacher Fight : इंदापूर (indapur) तालुक्यातील चाकाटी (School Teacher Fight) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपापसात हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाळकरी मुलांसमोर ही हाणामारी झाल्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
शुक्रवारी सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थ्यांसमोर हा प्रकार घडला. मारहाण करत असलेल्या शिक्षकांची बदली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नवीन शिक्षक येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. सुभाष ब.भिटे, उद्धव कुंडलिक गरगडे, संजीवनी गरगडे अशी हाणामारी करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत.
भिटे आणि संजीवनी गरगडे हे चाकाटीच्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. संजीवनी गरगडे यांचे पती उद्धव गरगडे हे लाखेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी भिटे आणि संजीवनी गरगडे यांची कुरबूर झाली. त्यानंतर शाळा सुटताना उद्धव गरगडे आल्यानंतर दोघांची भांडणे सुरु झाली. त्यानंतर घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर हाणामारीचा प्रकार घडला. झालेल्या प्रकाराबद्दल पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांना पत्र लिहिले आहे.
पालक संतापले
शाळेतील शिक्षकांचा हाणामारीचा प्रकार घडल्याने पालक संतापले आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांसमोरच हाणामारी झाली आहे. पालक मुलांना शिष्टचार आणि चांगले संस्कार देण्यासाठी शाळेत पाठवत असतात. त्याच शाळेत शिक्षकांचीच हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने मुलांना हे शिक्षक काय शिकवणार असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
शिक्षकांची बदली करण्याची मागणी
जिल्हा परिषद शाळेत सामान्य नागरिकांची मुलं शिक्षण घेतात. त्याच शाळेतील शिक्षकांमध्ये वादावादी झाल्याचं अनेकदा समोर येतं. मात्र या शिक्षकांवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये होणारे वाद आता हाणामारीपर्यंत पोहोचले आहे. याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होत आहे शिवाय त्यांच्या शिक्षणातदेखील अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे शिक्षकांची बदली करा, अशी मागणी पालकांकडून होत आहे,
हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल
सध्या सोशल मीडियावर एका सेकंदात एखादी माहिती किंवा व्हिडीओ लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. या शिक्षकांनी शाळेतील मुलांसमोरच हाणामारी केल्याचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला शिवाय त्याचे फोटोदेखील काढले गेले. शिक्षकांच्या या कृत्यामुळे पालक संतापले त्यांनी निवेदन तयार केलं त्यावर पालकांच्या सह्यादेखील घेतल्या. सगळ्या पालकांनी एकत्र येत त्यांनी शिक्षकांवर हल्लाबोल केला. पुराव्या सहित पालकांनी गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे.