Baba Adhav: बाबा आढाव कोण आहेत, त्यांचं आंदोलन नेमकं कशासाठी, आतापर्यंत कोणाकोणाचा पाठिंबा?
Baba Adhav: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी पुण्यातील फुले वाड्यात ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू केलं आहे.
पुणे : देशात आणि राज्यात नुकत्याच लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकींमध्ये सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर झाल्याच्या अनेक पक्षांनी तक्रारी केली. त्यानंतर आता राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या निकालानंतर विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र आहे. तर अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळे करून जिंकल्याचा दावा केला जात आहे, अशातच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी पुण्यातील फुले वाड्यात ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू केलं आहे.
आंदोलन नेमकं कशासाठी?
निवडणूक प्रक्रियेबाबत राज्यासह देशातील नागरिकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार ती पाळत नसेल तर नागरिकांना त्याविरोधात आवाज उठविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळेच हे आत्मक्लेश आंदोलन आहे, असं म्हणत बाबा आढाव यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं.
निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीची मूल्य उद्ध्वस्त होत असल्याचं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी म्हटलं होतं. या घटनेचा निषेध म्हणून 94 वर्षीय डाॅ. बाबा आढाव यांनी गुरुवारी आत्मक्लेश आंदाेलन पुकारलं. आज शनिवारी आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आढाव यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. बाबा आढाव यांनी गुरूवारी तीन दिवसांसाठीचं आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं होतं. आज त्यांच्या आंदोलनाचा शेवटचा दिवस आहे.
राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी वयाच्या 95 व्या वर्षांत पदार्पण केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केलं होतं. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे. त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे अनाकलनीय आहे, असे मत व्यक्त करीत तीन दिवस ते उपोषणाला बसले होते.
या लढ्याबाबत बोलताना बाबा आढाव म्हणाले, विधानसभा निवडणुकीत लोकशाहीच वस्त्रहरण करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत निर्णय वेगळा आणि लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा कसा लागतो, ईव्हीएम आणि पैशाच्या वापरामुळे हा निकाल आला आहे,. या निवडणुकीत सतत मतदानाची टक्केवारी बदलत गेली. तीन दिवस आत्मक्लेश आंदोलन करणार आणि त्यानंतर सरकारच्या विरोधात सत्याग्रह करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तर गौतम अदानींवर कारवाई झाली पाहिजे. आदानींच्या विरोधात लोकसभेत बोलू दिलं जात नाही. या सरकारच्या विरोधात मी सत्याग्रह करणार असल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.
आतापर्यंत कोणकोणत्या नेत्यांनी घेतली भेट?
1) शरद पवार यांनी आज सकाळी भेट बाबा आढाव यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये चर्चा झाली. शरद पवारांनी आपला पाठिंबा बाबा आढाव यांना जाहीर केला, त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर झाल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
2) आज दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे देखील बाबा आढाव यांनी आत्मकलेश आंदोलन सुरू केले आहे, त्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत.
3) काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी देखील डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय एकात्मता समिती पुणेच्या वतीने महात्मा फुले वाडा, पुणे येथे सुरू असलेल्या आत्मक्लेश उपोषणाला काल (शुक्रवारी) भेट दिली.
4) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बाबा आढवांच्या आत्मक्लेश उपोषण स्थळी भेट देणार असल्याची माहिती आहे.
कोण आहेत बाबा आढाव?
1970 च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीने नेते म्हणूनही काम करत होते. ‘एक गाव एक पाणवठा’ नावाची मोहिम चालवली जात होती. बाबा आढाव त्याचे प्रणेते होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची मोठी ओळख आहे. ते 94 वर्षांचे आहेत.