पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा तोडफोड, दोघे जखमी
वाकडच्या काळाखडक येथे काल रात्री तोडफोडीची घटना घडली आहे, ज्यामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत. गाडीची सीट कव्हर फाडल्याच्या वादातून ही घटना घडली आहे.
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वाहन तोडफोडीने तोंड वर काढलं आहे. वाकडच्या काळाखडक येथे काल रात्री तोडफोडीची घटना घडली आहे, ज्यामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत. गाडीची सीट कव्हर फाडल्याच्या वादातून ही घटना घडली आहे.
तीन दिवसांपूर्वी एका दुचाकीची सीट कव्हर अज्ञातांनी फाडली होती. दुचाकी मालकाचा एकावर संशय होता. त्यामुळे या घटनेचा बदला घेण्यासाठी काळाखडक परिसरात 20 ते 22 समाजकंटकांनी हा धुडगूस घातला. हातात तलवार, कोयते आणि लाठ्या-काठ्या घेऊन या गुंडांनी काळाखडक झोपडपट्टीत प्रवेश केला.
सीट फाडल्याचा संशय ज्याच्यावर होता, त्याच्या गाडीसह पाच वाहनांची तोडफोड या गुंडांनी केली. या तोडफोडीदरम्यान या गुंडांनी एकाच्या डोक्यात वार केला, तर तीन वर्षीय चिमुरड्यालाही मुका मार लागला आहे. या घटनेने काळाखडक परिसरात दहशत पसरली आहे.
या प्रकरणी वाकड पोलिसांनी काही समाजकंटकांना अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून या ठिकाणी वेळोवेळी असे प्रकार घडत आहेत. मात्र अशा घटना रोखण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत.