Vasant More : मी राजमार्गावरच, आमच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाहीत : वसंत मोरे
आमच्यात काही मतभेद आहेत, मात्र मनभेद नाहीत. मी राजमार्गावरच असल्याचे वक्तव्य पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी केले आहे.
Vasant More : एखाद्या लढाईला एखादा सैनिक नसला म्हणजे कोणी लढाई हरत नाही. माझ्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होते असे वक्तव्य पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी केले. आमच्यात काही मतभेद आहेत, मात्र मनभेद नाहीत. मी राजमार्गावरच आणि राजमार्गावरच राहणार असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.
आमच्या भागात कोणत्याही प्रकारची आरती झाली नाही. मुस्लिम बांधवांनी अजानचा आवाज बंद केला आहे. सकाळची अजान अंतर्गत होते. मी केलेल्या आवाहनाला त्यांनी साथ दिल्याचे मोरे यांनी सांगितले. ज्या ज्या वेळेस तुम्हाला अडचणी येत असतात त्यावेळी समजा की तुम्ही योग्य मार्गावर आहात असेही ते म्हणाले. आंध्र प्रदेशमध्ये बालाजीला गेल्यावर कोणत्याही पक्षाचा झेंडा गाडीला ठेवता येत नाही. सगळे खाली काढले जाते. त्यामुळे मी भाड्याने गाडी करुन गेलो. पण गाडीवरचा झेंडा खाली उतरवला नसल्याचे मोरेंनी सांगितले. पुण्यामध्ये पहिल्यादिवशी फटाके वाजवण्याचा जो कार्यक्रम झाला तो मला थोडा खटकला. मिरवणूक काढण्यात आली, पेढे वाटण्यात आले, ते मला खटकल्याचे मोरे म्हणाले.
मी सध्या शांत आहे, नाराज नाही
मी अस्वस्थ, नाराज नाही. पण मी सध्या शांत आहे. माझी मागच्या चार वर्षात धावपळ झाली आहे. विविध आंदोलने केली आहेत. पक्षाची बांधणीमध्ये मी काम केले. सध्या कुटुंब आणि व्यवसायाकडे लक्ष देत असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. माझ्या प्रभागामध्ये सहा मशिदी आहेत. त्या भागात सर्वांनी नियमांचे पालन केले आहे. मी त्या लोकांना सांगितल्याप्रमाणे ऐकल्याचे मोरे यावेळी म्हणाले. मी आजारी पडत नाही, मी आजारी पाडतो असेही मोरे म्हणाले. पक्ष ज्यावेळी मोठा होत असतो त्यावेळी पक्षांतर्गत कुरघोडी सुरु असतात. आज आमच्यामध्ये थोडे मतभेद आहेत मात्र, मनभेद नाहीत. मतभेद असमे जिवंतपणाचे लक्षण असल्याचे मोरेंनी यावेळी सांगितले.
मी दरवर्षी बालाजीला जात असतो. गेल्या 17 ते 18 वर्षापासून मी बालाजीला जात असतो. दीड महिन्यापूर्वी बुकींग केले होते. तो माझा पूर्वनियोजीत दौरा होता, त्यामुळे गेलो होते असे मोरेंनी सांगितले. मशिदीसमोर भोंगे लावण्याच्या राज ठाकरेंच्या आदेशानंतर वसंत मोरे अज्ञातस्थळी गेले होते. मात्र, त्यांनी माझा बालाजीला जाण्याचा पूर्वनियोजीत कार्यक्रम होता, त्यासाठी मी गेलो असल्याचा खुलासा केला आहे.