लोणावळ्यात पर्यटकांचा गोळीबार, उच्छाद माजवणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील चौघांवर गुन्हा दाखल
पावसाने जोर धरल्याने पुणे-मुंबईतील उतावळे पर्यटक कायदा झुगारून लोणावळ्याची वाट धरत आहेत. विनापरवाना, विनामास्क भटकत सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवणाऱ्या शेकडो पर्यटकांवर आजवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड ही वसुल करण्यात आलाय, तरीही पर्यटक मात्र धास्तावलेले नाहीत.
![लोणावळ्यात पर्यटकांचा गोळीबार, उच्छाद माजवणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील चौघांवर गुन्हा दाखल Tourist shooting in Lonavla A case has been registered against four persons from Pimpri Chinchwad लोणावळ्यात पर्यटकांचा गोळीबार, उच्छाद माजवणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील चौघांवर गुन्हा दाखल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/10130958/Lonavla-golibar01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : रिकामटेकड्या पर्यटकांना आवर घालता-घालता पुण्यातील लोणावळा पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत. कारवाईचा बडगा उगारला तरीही पर्यटक तोंडवर करून पर्यटनस्थळ गाठतच आहेत. त्यातच पावसाने जोर धरल्याने पुणे-मुंबईतील उतावळे पर्यटक कायदा झुगारून लोणावळ्याची वाट धरत आहेत. शनिवारी तर पिंपरी चिंचवडमधील पर्यटकांनी उच्छादच गाठला. परवानाधारक बंदुकीतून हवेत गोळीबार करण्याइतपत या पर्यटकांची मजल गेली. याप्रकरणी चार उतावळ्या पर्यटकांवर गुन्हा दाखल झाला असून पाच काडतुसांसह बंदूक जप्त करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवडमधील सागर मोहन भूमकर (वय 35), सचिन बाळासाहेब भूमकर (वय 35), मुळशी तालुक्याच्या नरे गावातील संदीप हनुमंत जाधव (वय 36) आणि जांबे गावातील सचिन साहेबराव मांदळे (वय 38) या चार उताविळवीरांनी शनिवारी लोणावळ्याची वाट धरली. जून महिन्यातच जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनाला बंदी घातल्याने पोलीस आणि प्रशासनाची नजर चुकवूनच त्यांना लोणावळ्यात दाखल व्हायचं होतं. शहरातील मुख्य चौक आणि चौकातील पोलीस चौकी पार करून या चौघांना लोणावळ्यात प्रवेश करण्यात यश आलं, किंबहुना यात पोलीस आणि प्रशासनाचे दुर्लक्ष त्यांच्या पथ्यावर पडलं. पर्यटकांना खुनवणाऱ्या सहारा पुलावर हे चौघे पोहचले, सायंकाळी पावणे सातच्या कायदा झुगारून त्यांची मौजमजा सुरु झाली. विनामास्क ते बिनबोभाट वावरत होते. सायंकाळी या पुलावर शहरातील शेकडो व्यक्ती व्यायामासाठी येत असतात. या सर्वांदेखत सागरने त्यांच्या कंबरेला असणारी परवानाधारक बंदूक बाहेर काढली. अन् लोड केली. मग आकाशाच्या दिशेला बंदुकीचा निशाणा साधत त्याने ट्रिगर दाबला. अचानक बंदुकीचा आवाज आल्याने उपस्थित सर्व धास्तावले. गोळीबाराचा आवाज ऐकून पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांच्या या कृत्याने उपस्थितांच्या जीव आणि व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आल्याने, चौघांना ही पोलिसांनी ताब्यात घेतलं. घडल्या प्रकाराबाबत पोलिसांनी विचारले असता मौजमजेतून हा उच्छाद माजवल्याचं त्यांनी सांगितलं. मग पोलिसांनी बंदूक, पाच जीवंत काडतुस आणि एक पुंगळी असा ऐंशी हजाराचा शस्त्रसाठा जप्त केला.
लोणावळा शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघांना सोडण्यात आले, पण सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल. गेल्याच आठवड्यात फार्म हाऊसमध्ये पार्टी करणाऱ्या वाशीतील सात पर्यटकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर विनापरवाना, विनामास्क भटकत सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवणाऱ्या शेकडो पर्यटकांवर आजवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड ही वसुल करण्यात आलाय, तरीही पर्यटक मात्र धास्तावलेले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या :
...म्हणून पिंपरी चिंचवडमधील 'या' चार रुग्णालयांना धाडल्या नोटीस!
पोलिसांची वर्दी घालून सोन्याचे दुकान लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)