मोठी बातमी! गोपीचंद पडळकरांवर झालेल्या चप्पलफेक प्रकरणात गुन्हा दाखल; 10 ते 15 मराठा आंदोलकांवर गुन्ह्याची नोंद
Gopichand Padalkar : या प्रकरणी आता अज्ञात मराठा आंदोलकांवर (Maratha Protesters) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, पोलिसांकडून गुन्हा दाखल झालेल्या आंदोलकांचा शोध घेतला जात आहे.
बारामती : इंदापुरात (Indapur) गोपीचंद पडळकरांवर (Gopichand Padalkar) यांच्यावर करण्यात आलेल्या चप्पलफेक प्रकरणात आता पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापुर येथील ओबीसी (OBC) एल्गार मेळावा संपल्यावर बाजूलाच असलेल्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या उपोषणाला भेटण्यासाठी गोपीचंद पडळकर निघाले असतांना त्यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी आता अज्ञात मराठा आंदोलकांवर (Maratha Protesters) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, पोलिसांकडून गुन्हा दाखल झालेल्या आंदोलकांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, एकीकडे गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक केल्याप्रकरणी मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असतानाच, दुसरीकडे पडळकरांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे. गोपीचंद पडळकरांवर त्यांच्याच माणसांनी चप्पलफेक केल्याचं स्पष्टीकरण मराठा समाजाकडून देण्यात आलं आहे. तसेच, पडळकरांचीच माणसंच आमच्यावर धावून आल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आला होता. त्यामुळे, पडळकरांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे.
राज्यभरात धनगर समाज आक्रमक...
इंदापूर येथे गोपीचंद पडळकर यांच्यावर करण्यात आलेल्या चप्पलफेक प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहे. राज्यभरात ओबीसी समाज आणि धनगर समाजाकडून आंदोलनं केले जात आहे. जालना जिल्ह्यात देखील या घटनेचा धनगर समाजाकडून निषेध करण्यात आला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करून टायर जाळण्यात आले. सोबतच परतूरमध्ये बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे राज्यभरात ठिकठिकाणी अशाच प्रकारे आंदोलनं पाहायला मिळाले.
आज इंदापूर बंदची हाक...
गोपीचंद पडळकर यांच्यावरती झालेल्या चप्पल फेकीच्या निषेधार्थ आज इंदापूर शहरासह तालुका बंदची हाक देण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद असतील. आजच्या बंदला सकाळच्या सत्रात चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. विशेष, या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया...
दरम्यान, या सर्व घटनेवर खुद्द गोपीचंद पडळकर यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "इंदापूर सभेनंतर दुधासाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी जाताना भेकड प्रकार घडला. परत, या नौटंकीबाजांनी हे माझ्याच कार्यकर्त्यांनी केलं असे सांगितले. मी संयमाची भूमिका घेतली, अन्यथा भेकडांच्या अंगावर कपडेही राहिले नसते. ओबीसी बांधवांनो याचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये," असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Gopichand Padlakar : गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर इंदापुरात घडली घटना