Pune Ganpati Visrajan: गणपती विसर्जनादरम्यान पुण्यामध्ये ३ जणांचा आकस्मिक मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर कारण होणार स्पष्ट
Pune Ganpati Visrajan: पुण्यामध्ये गणपती विसर्जनदरम्यान तीन जणांचा आकस्मित मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
पुणे: राज्यभरात गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा भक्तीमय वातावरणात, पार पडला. गणरायाला निरोप देताना काही ठिकाणी दुर्दैवी घटनाही घडल्या. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गणरायाचे विसर्जन करताना भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यामध्ये गणपती विसर्जनदरम्यान (Pune Ganpati Visrajan) तीन जणांचा आकस्मित मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
पुण्यात 3 जणांचा आकस्मिक मृत्यू
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात विसर्जनादरम्यान(Pune Ganpati Visrajan) तिघांचा आकस्मित मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नयन ढोके, विशाल बल्लाळ, या दोघांसह एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती ससून रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. या तिघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे शवविच्छेदन अहवालातून समोर येईल. लक्ष्मी रोड, टिळक रोड व एकाचा कसबा गणपती मंडळाजवळ मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात आली आहे. सध्या तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात केलं जात असून लवकरच त्याचा अहवाल येणार आहे.
प्राथमिक अहवालानुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, ससून हॉस्पिटलमध्ये त्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी दोन्ही मृतदेहांचे व्हिसेरा पुढील तपासासाठी जतन करण्यात आले आहेत.
नयन रवींद्र ढोके (२७) आणि विशाल बल्लाळ (३५) अशी मृतांची नावे आहेत. रात्री 11.30 च्या सुमारास विजय टॉकीजवळ नयन हा गतिहीन अवस्थेत आढळून आला. मंगळवारी. डॉ. सौरभ बरकुले आणि चालक महेश राठोड यांनी डायल १०८ वरून रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली. तपासणी केल्यावर त्यांना नयन अजूनही श्वास घेत असल्याचे आढळले. पोलिसांच्या मदतीने, नयनला त्वरीत जवळच्या कार्डियाक ॲम्ब्युलन्समध्ये हलवण्यात आले. आरोग्य शिबिरातील डॉक्टर बरकुले, तुषार जगताप आणि सीपीआरचे उपचार करणारे डॉ. संदीप बुटाला यांनी प्रयत्न करूनही त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले. याबाबतचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
डिजेचा दणदणात होता पण दरवर्षीपेक्षा ध्वनीची पातळी कमी
गणेश विसर्जन मिरवणूकदरम्यान गेली सलग दोन वर्षे 100 डेसिबलपेक्षा अधिक नोंदविली जाणारी आवाजाची पातळी यंदा मात्र तुलनेने कमी नोंदविली गेली आहे. सीओइपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे तर्फे गणेश विसर्जना दरम्यान घेण्यात आलेल्या नोंदीच्या अहवालानुसार, यंदा पुण्यात लक्ष्मी रस्त्यावरील सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत एकंदर आवाज सरासरी 94.8 डेसिबल इतका नोंदविण्यात आला आहे. ही पातळी गेल्या दोन वर्षांमधील ध्वनीच्या पातळीपेक्षा कमी असली तरी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आहे, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील उत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषणाची परंपरा कायम राहिली आहे.
वर्ष
2021- 59.8 डेसिबल
2022- 105.3 डेसिबल
2023- 101.2 डेसिबल
2024- 94.8 डेसिबल
काही वर्षांमध्ये मिरवणुकीसाठी लागलेला वेळ
2016 : 28 तास 30 मिनिट
2017 : 28 तास 05 मिनिट
2018 : 27 तास 15 मिनिट
2019 : 24 तास
2020 आणि 2021 : कोविड महामारीमुळे मिरवणूक निघाली नाही
2022 : 31 तास
2023 : 28 तास 40 मि.
2024: 28 तास