एक्स्प्लोर
भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसेंविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू
पुणे: भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये खडसेंविरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणाची अप्पर पोलिस महासंचालकाच्या देखरेखीखाली चौकशी करा असा आदेश उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ८ मार्च २०१७ रोजी दिला होता.
त्यानुसार एसीबीने आज बंडगार्डन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम १३ (१) ड, (२), १५ आणि भादंवि १०९प्रमाणे एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी, जावई आणि इतर अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. हेमंत गावडे यांनी ३० मे २०१६ रोजी बंडगार्डन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जालाच फिर्यादच समजावी आणि प्रकरणाचा तपास करावा असे आदेश कोर्टानं पोलिसांना दिले आहेत. या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली असून हे काम पहाटे उशीरापर्यंत सुरु राहणार आहे.
दरम्यान, याप्रकरणी एकनाथ खडसेंनी एबीपी माझाला फोनवरुन आपली प्रतिक्रिया दिली.
‘सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. पण माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. तब्बल पाच वेळा या प्रकरणाची चौकशी झाली असून यामध्ये काहीही सापडलेलं नाही. याप्रकरणी पोलिसांनीच अॅफिडेबिट करुन प्रकरणात तथ्य नसल्याचं कोर्टात सांगितलं आहे. त्यामुळे मी निर्दोष असल्याचं नक्कीच सिद्ध होईल.’ असं खडसे म्हणाले,
‘माझ्या विरुद्ध ज्या हेमंत गावडेंनी तक्रार दाखल केली आहे त्यांचीच खरं तर चौकशी होणं गरजेचं आहे. कारणी जमिनी त्यांनी हडप केल्या आहेत. माझ्या जावयाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझा जावई एनआरआय आहे. त्यानं जमिनी विकत घेऊ नये? काहीही झालं तरी महाराष्ट्रातील जनता माझ्यासोबत आहे. विरोधी पक्ष नेता असताना मी अनेक मंत्र्यांना अडचणीत आणलं होतं. त्यामुळे हीच लोकं माझ्याविरुद्ध सध्या सूडाचं राजकारण करत आहेत. मी महाराष्ट्रात जिथं-जिथं फिरतो. तिथली लोकं मला सांगतात की, नाथाभाऊ तुमच्यावर अन्याय झाला आहे.’ असंही खडसे म्हणाले.
भोसरी जमीन खरेदीप्रकरण काय आहे?
भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचा हा वाद आहे. ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून, तीन कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले. पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं.
महसूलमंत्री असताना खडसेंनी भोसरीत केलेल्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आले. त्यानंतर याप्रकरणाच्या चौकशीसाठी एका वर्षापूर्वी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या एक सदस्यीस समितीची स्थापना करण्यात आली होती.
संबंधित बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement