Vanraj Andekar Case : वनराज आंदेकरांच्या हत्या करण्यामागे नेमका हेतू काय होता? 'हा' मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय, चौकशी सुरू
Vanraj Andekar Case : आंदेकर यांची हत्या कौटुंबिक, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पुणे: पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नियोजनबद्ध पध्दतीने कट रचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आंदेकर यांची हत्या कौटुंबिक, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर या हत्येमागचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड (Somnath Gaikwad) असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.
आंदेकर हत्या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. वनराज यांच्या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड (Somnath Gaikwad) असल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नाना पेठेत आरोपी गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे आणि शुभम दहिभाते यांच्यावर कोयता आणि स्कू-ड्रायव्हरने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात निखिलचा मृत्यू झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी सोमनाथने संजीवनी, जयंत, प्रकाश आणि गणेश कोमकर यांच्याशी संगनमत करून वनराज यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी शहरातून पाच जणांना अटक केली होती. तर, रायगड जिल्ह्यातून अन्य 13 संशयितांना अटक केली आहे.
आंदेकर हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असण्याचा पोलिसांना संशय
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड (Somnath Gaikwad) असण्याचा पोलिसांना संशय आहे. आंदेकरांवर पाळत ठेवून आरोपींनी खून केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नाना पेठेतील उदयकांत आंदेकर चौकात आंदेकर दररोज सायंकाळी थांबतात, याची माहिती आरोपींना होती. आंदेकरांची बहीण संजीवनीने आरोपींना चिथावणी दिली होती. आरोपींनी पिस्तूल कुठून आणले, तसेच पसार झालेल्या आरोपींचा शोध घ्यायचा असल्याने सरकारी वकिलांनी आरोपी बहीण संजीवनी, दीर प्रकाश आणि सोमनाथला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे.
आंदेकरांची हत्या कौटुंबिक संपत्ती, वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा संशय
आंदेकरांची हत्या कौटुंबिक संपत्तीचा वाद, आणि वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. आंदेकर यांची हत्या रविवारी रात्री (ता. 1) नाना पेठेतील डोके तालीम परिसरात गोळ्या झाडून, कोयत्याने वार करून करण्यात आली . प्राथमिक तपासात बहीण संजीवनी, तिचा पती जयंत, दीर गणेश, प्रकाश यांच्याशी आंदेकर यांचे वाद झाले अशी माहिती समोर आली होती. आंदेकरांच्या सांगण्यावरून दुकानावर अतिक्रमण कारवाई झाल्याच्या रागातून कोमकर यांनी हत्येचा कट रचला आणि आंदेकर टोळीतून फुटलेल्या सोमनाथ गायकवाडची मदत घेतल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.