Shiv Jayanti 2025: शिवजयंतीनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल, कोणते रस्ते राहणार बंद? या पर्यायी मार्गांचा करा वापर?
Shiv Jayanti 2025: वाहनचालकांनी मिरवणूक मार्ग वगळून पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिस शाखेने केले आहे.

पुणे: पुणे शहर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्य मिरवणुकीसह अन्य एक मिरवणूक आणि पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यामुळे आज, बुधवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील बहुतांश सर्वच रस्ते सकाळपासून वाहतुकीसाठी पूर्ण आणि अंशतः बंद केले जाणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी मिरवणूक मार्ग वगळून पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिस शाखेने केले आहे.
आज 'जय शिवाजी जय भारत' पदयात्रेचे आयोजन केले आहे. या पदयात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित राहणार आहे. तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य वस्तीतील वाहतूकीत शिवजयंती दिवशी बदल करण्यात येत आहे. पदयात्रेचे आयोजन शिवजयंतीनिमित्त केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने 'जय शिवाजी जय भारत पदयात्रे'चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बुधवारी सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत जंगली महाराज रस्ता आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यासह काही प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. पदयात्रा इंजिनीअरिंग कॉलेज मैदान ते फर्ग्युसन कॉलेज मैदान या मार्गावर काढण्यात येणार आहे.
🛑दिनांक १९/०२/२०२५ रोजी श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तसेच "जय शिवाजी जय भारत "पदयात्रे अनुषंगाने शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबत प्रसिद्धीपत्रक.. pic.twitter.com/F3ouuYMmFT
— पुणे शहर वाहतूक पोलीस (@PuneCityTraffic) February 18, 2025
जय शिवाजी जय भारत पदयात्रा
ही पदयात्रा इंजिनिअरिंग कॉलेज ग्राऊंड, स गो बर्वे चौक, एसएसपीएमएस कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, स गो बर्वे चौक, मॉर्डन चौक, झाशी राणी चौक, खंडोजी बाबा चौक, गुडलक चौक, फर्ग्युसन कॉलेज ग्राऊंड अशी जाणार आहे. त्यामुळे जंगली महाराज रोड व फर्ग्युसन कॉलेज रोडवरील वाहतूक आवश्यकतेप्रमाणे 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेच्या दरम्यान बदल करण्यात येणार आहे. जंगली महाराज रोड वरील वाहतूक संचेती हॉस्पिटल चौक ते खंडोजी बाबा चौक पर्यंत आवश्यकतेप्रमाणे बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : इंजिनिअरींग कॉलेज चौकातून येणारी वाहने डावीकडे कामगार पुतळा मार्गे, नेहरू रोड व एम जी रोडने इच्छित स्थळी जातील. तसेच बाणेर, पाषाण, कोथरुड, कर्वेरोड कडे जाणारी वाहने उजवीकडे वळून सिमला ऑफीस चौक मार्गे वीर चाफेकर उड्डाणपुलावरुन व सेनापती बापट रोडने इच्छित स्थळी जातील.
(सिमला ऑफिस चौक ते संचेती चौक हा मार्ग दुहेरी वाहतूक करण्यात येत आहे.) फर्ग्युसन कॉलेज रोडवरील वाहतूक खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज गेट, वीर चाफेकर चौकपर्यंत आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग : कोथरुड, कर्वे रोड, खंडोजी बाबा चौकात येणारी वाहतूक, एस एन डी टी कॉर्नर मार्गे लॉ कॉलेज रोड, एस बी रोड इ, मार्गे व नळस्टॉप चौक येथून उजवीकडे वळून कन्हेरी रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.
वाहनांसाठी पार्किंगची विशेष व्यवस्था
1) खडकी, येरवडा, 'आरटीओ 'कडून येणाऱ्यांनी अभियांत्रिकी कॉलेज येथे पार्किंग करावे.
2) कर्वे रस्ता आणि कोथरूडकडून येणाऱ्या वाहनांनी अलका टॉकीज चौकमार्गे नदीपात्रातील पार्किंगमध्ये वाहने पार्क करावीत.
3) स्वारगेट, हडपसर आणि दांडेकर पुलाकडून येणारी वाहने अलका टॉकीज चौकामार्गे नदीपात्रात पार्क केली जातील.
























