आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार?
Shivajirao Adhalarao Patil : शिवाजी आढळराव पाटील यांची बदललेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार याचेच संकेत असल्याची चर्चा आहे.
Shirur Lok Sabha Constituency : पुण्यातील शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) नेहमीच अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. मात्र, अलीकडे तेच आढळराव अजित दादांचे गोडवे गाऊ लागलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) 6 जानेवारीला शिरूर लोकसभेत आढळरावांसाठी जाहीर सभा घेतायेत. मात्र, हा अजित दादांचा जिल्हा आहे, त्यांचं इथं प्राबल्य आहे असं शिवाजी आढळराव म्हणाल्याने त्यांची विपरीत शैली यातून दिसून येत असल्याची चर्चा आहे. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना अजित दादांनी आव्हान दिलं, त्यानंतर आढळराव असे मवाळ झाल्याचं दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. त्यांची, बदललेली ही भूमिका ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार याचेच संकेत असल्याची देखील चर्चा आहे.
मागील काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवारच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहे. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करून अमोल कोल्हे यांना पाडणार असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवारच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अधिकच वाढल्या आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांच्यावर नेहमी टीका करणारे शिवाजीराव आढळराव पाटील आता त्यांच्यावर बोलतांना काळजी घेतांना दिसत आहे. एवढंच नाही तर अजित पवारांनी जरी शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला असला, तरी त्यांच्या दाव्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. कारण हा त्यांचा जिल्हा आहे आणि या मतदारसंघावर त्यांचं वर्चस्व आहे, असे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकारण...
अमोल कोल्हे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पाडणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केल्यापासून शिरूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे मागच्यावेळी या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे मैदानात होते. मात्र, या दोन्ही पक्षात आता दोन गट निर्माण झाले आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील शिंदे गटात आणि अमोल कोल्हे शरद पवार गटात आहेत. महाविकास आघाडीत अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, महायुतीमध्ये एकीकडे शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, दुसरीकडे अजित पवारांनी देखील याच मतदारसंघात निवडणूक लढवण्याच म्हटले आहे. मात्र, शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटाकडून की अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
लोकसभेची निवडणूक लढणारच...
'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देतांना शिवाजी आढळराव पाटील म्हणाले की, "शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचा निर्धार करणारे अजित पवारचं शिरूर लोकसभेचा त्यांचा उमेदवार कोण असेल हे तेच ठरवतील. मात्र, मी शिंदे गटातच राहणार. अजित पवार गटाचे तिकीट घेऊन शिरूरची निवडणूक लढणार, या चर्चांना अद्याप अजित दादांनी ही दुजोरा दिलेला नाही. मात्र, मी शिरूर लोकसभेची निवडणूक लढणार हे निश्चित असल्याचे शिवाजी आढळराव पाटील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: