Pune Crime News: भीमथडी जत्रेत चोरी करणारे गजाआड; 71 हजार रुपयांची रोकड आणि पेनड्राइव्ह चोरला, इतक्या गर्दीत कसा केला तपास?
Pune Crime News: पुण्यातील भीमथडी जत्रेतील एका स्टाॅलमधून 71 हजारांची रोकड चोरणाऱ्या चोरट्यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे: भीमथडी जत्रेमध्ये स्टॉलधारक महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी तब्बल 71 हजार रुपयांची रोकड आणि पेनड्राइव्ह चोरुन नेला. ही चोरी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती, तात्काळ शिवाजीनगर पोलिसांनी 4 जणांना अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातून अटक केली आहे. मनोज भगतसिंग पवार, संदीप संजय गौड, रतिलाल प्रेमलाल परमार, विकी साळुंखे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार सिंचननगर येथील भीमथडी जत्रेत रविवारी सायंकाळी पाच वाजता घडला होता.
फिर्यादी महिला यांचा भीमथडी जत्रेत महिला बचत गटाचा स्टॉल आहे. रविवारी जत्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यावेळी त्यांनी आतल्या बाजूला ठेवलेल्या बॉक्समधून चोरट्यांनी 71 हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. ही गोष्ट त्यांच्या लगेच लक्षात आली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी स्टॉलवरील सीसीटीव्ही तपासले आणि तांत्रिक विश्लेषण मधून पोलिसांना या तरुणांपर्यंत पोहचता आलं आणि त्याला ताब्यात घेतलं.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही मूळची वाई जवळील आझर्डे गावच्या रहिवासी आहेत. सिंचननगर येथील मैदानावर भीमथडी जत्रेमध्ये तक्रारदार महिलेने विविध वस्तू विक्रीचा स्टाॅल लावला होता. रविवारी स्टाॅलच्या गल्ल्यातून 71 हजार रुपयांची रोकड आरोपी पवार, गौड, परमार, साळुंखे यांनी चोरली होती. यापूर्वी कोथरुड भागातील एका महिलेच्या स्टाॅलमधील 70 हजार रुपयांची रोकड चोरीला गेली होती.