Pune Shivaji Adhalrao Patil: शिवाजी आढळराव पाटील 'असे' पोहचले शिंदे गटात
शिंदे गटाने शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. त्यात उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
Pune Shivaji Adhalrao Patil: शिंदे गटाने शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. त्यात नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. या दोघांचीही काही तासांपूर्वीच शिवसेनेतून पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणाखाली हकालपट्टी करण्यात आली होती. शिंदे गटाने उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती अनावधानाने प्रसिद्ध झाली अशी कबुली शिवसेनेकडून देण्यात आली होती. त्यानंतर यांनी मी शिवसेनेतच आहो, असं जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी ठाकरे सरकारसाठी कोणतंही कार्य केलं नव्हतं. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही केला होता.
शिवाजी आढळराव कसे पोहचले शिंदे गटात?
26 जूनला उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवाजी आढळरावांनी शिवसेनेचा मेळावा घेतला. सचिन अहिरांची हजेरी होती. 2 जुलैला मुख्यमंत्री विराजमान झालेल्या एकनाथ शिंदेंना सोशल मिडियाद्वारे आढळरावांनी शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा दिल्या म्हणून आढळरावांची 3 जुलैला शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचं वृत्त सामनामध्ये प्रसिद्ध झालं. काही तासांत पक्षाने यूटर्न घेतला आणि आढळराव पक्षातच असल्याचं प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलं. या कारवाईनंतर पक्षाने माझी किंमत दाखवून दिली, असं वक्तव्य करत आढळरावांनी पत्रकार परिषदेत उघडपणे नाराजी व्यक्त केली. लवकरच पुढची दिशा ठरवेन असं ही सूचित केलं होतं.
5 जुलैला शिवाजी आढळरावांना मातोश्रीवर बोलविण्यात आलं. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले. तुम्ही जोमाने कामाला लागा, मी लवकरच शिरूर लोकसभेचा दौरा करेन. असं आश्वासन ठाकरेंनी दिलं. मातोश्रीवरून आल्यानंतर आढळराव कुठंच सक्रीय नव्हते. ठाकरे गटासाठी त्यांनी कोणतंच कार्य केलं नाही. 8 जुलैला शिंदे गटाच्या नवी कार्यकारिणीत शिवाजी आढळरावांची उपनेते पदी निवड झाल्याचं जाहीर केलं.