Sharad Pawar: शरद पवार यांचा पुण्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, नेमकं काय आहे कारण?
Sharad Pawar: शरद पवार यांनी या भीमथडी यात्रेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. त्याचबरोबर भीमथडीला येण्याचं निमंत्रण दिल्याची माहिती आहे.
पुणे: पुण्यात भरलेल्या भीमथडी जत्रेला आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी भीमथडीत जत्रेतील स्टॉल्सची पाहणी केली. त्याचबरोबर येथे आलेल्या विक्रेत्यांची संवाद साधला. येथे आलेल्या अनेकांनी शरद पवार यांना आपल्या उत्पादनांबद्दलची माहिती दिली. काही गोष्टी भेटी दिल्या आहेत. भीमथडी जत्रेची अनेक वर्षांची परंपरा आहे आणि महाराष्ट्राच्या अनेक गावांमधून, खेड्यातून लोक इथे एकत्र येतात, पुणेकरांनी देखील मोठ्या प्रमाणावर भीमथडी जत्रेत गर्दी केली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी या भीमथडी यात्रेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. त्याचबरोबर भीमथडीला येण्याचं निमंत्रण दिल्याची माहिती आहे.
शरद पवार (Sharad Pawar) भीमथडी जत्रेला भेट देण्यासाठी दाखल झाले. महाराष्ट्राच्या ग्रामीण गावगाड्याचं आणि खाद्य संस्कृतीचं दर्शन घडवणारी, ग्रामीण भागातील महिला व्यवसायिकांना चालना देणारी भिमथडी जत्रा पुणेकरांचं आकर्षण ठरत आहे. 20 डिसेंबरपासून सुरू झालेली भीमथडी जत्रा 25 डिसेंबरपर्यंत सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू आहे. आज शरद पवारांनी (Sharad Pawar) या ठिकाणी भेट दिली त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून या ठिकाणी भेट देण्याचं आवाहन केल्याची माहिती आहे. मात्र देवेंद्र फडणवीस येणार का याची देखील उत्सुकता लागली आहे.
भीमथडी जत्रेचे यंदाचे हे 18 वे वर्ष
भीमथडी जत्रेचे यंदाचे हे 18 वे वर्ष आहे. या जत्रेत दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्राची कलासंस्कृती गोंधळी, पोतराज, भारुड, पाथरवट, बुरुड, केरसोनीवाले, नंदीबैल अशा गोष्टी पुणेकरांना अनुभवायला मिळत आहेत. ग्रामीण खाद्य महोत्सवात - ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनविलेल्या हस्तकला, उन्हाळी पदार्थ, चटण्या, मसाले, वेगवेगळ्या प्रकारची लोणची, कपडे, फळे, पालेभाज्या, कडधान्य इत्यादी उत्पादने विक्रीस उपलब्ध असतील. भरड धान्यामध्ये ज्वारीचा पिझ्झा बेस ब्रेड, खाकरा, भरडधान्याची पीठे, ज्वारीच्या लाह्या यासह भगर, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई इत्यादी भरड धान्य विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
याशिवाय नवीन पदार्थ अनुभवण्यासाठी खापरावरील पुरण पोळी, खान्देशी मांडे, जळगावच्या वांग्याचे भरीत, मासवडी, उकडीचे मोदक, विदर्भाची स्पेशल लंबी रोटी व वडा भात यांसह नॉन व्हेज विभागात नेहमी प्रमाणे कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, मालवणी फिश थाळी, राशिनचे सुप्रसिद्ध मटन, चिकन व मटन वडे असे विविध खाद्य पदार्थ पुणेकरांसाठी उपलब्ध आहेत.
शरद पवारांची प्रतिक्रिया
भीमथडी सुरू झाली त्याला 18 वर्ष झाली. आप्पासाहेब पवार यांना ही जत्रा यावेळी समर्पित आहे. चांगला प्रतिसाद आहे, राज्य आणि बाहेरून प्रतिसाद मिळत आहे. देशपातळीवर भीमथडी जात आहे याचा आनंद आहे, असं शरद पवार म्हणालेत. तर देवेंद्र फडणवीसांना फोन केला त्याबाबत बोलताना म्हणाले, फोनवरून बोलेल तुम्ही ऐकले का? यंदा साहित्य संमेलन आहे, त्यासाठी मुख्यमंत्री यावं असं साहित्यिकांनी सुचवलं होतं. त्यांनी निमंत्रण स्वीकारला आहे. दुसऱ्या कामासाठी फोन केला होता. मी काल ज्या (परभणी, मस्साजोग) ठिकाणी भेटून आलो, त्यावर मी मुख्यंमंत्री यांना बोललो, मी त्यांना सांगितले स्थिती गंभीर आहे त्याची नोंद घेतली पाहिजे.