(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मला वाटतं ते रात्री कपडे घालूनच तयार असतात, शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना विधानसभेत मराठा आरक्षणाबाबत जो ठराव मंजूर झाला त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता महाराष्ट्राच्या सरकारने याला अनुकूल भुमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारबाबत अपेक्षा ठेवणं बरोबर नाही, असं शरद पवार म्हणाले.
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य केलं होत. यावरुन शरद पवारांना त्यांना टोला लगावला आहे. शरद पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आताचे सहा महिने गेले आहेत. आणखीन साडेचार वर्षे त्यांना वाट पाहावी लागेल. मला वाटतं ते रात्री कपडे घालूनच तयार असतात. पहाटे काही झालं तर आपण गेलेलं बरं.
मराठा आरक्षणाबाबत चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटलांना कदाचित मराठा आरक्षणाबाबत विस्मरण झालं असेल. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना विधानसभेत मराठा आरक्षणाबाबत जो ठराव मंजूर झाला त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता महाराष्ट्राच्या सरकारने याला अनुकूल भुमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारबाबत अपेक्षा ठेवणं बरोबर नाही. आता यामध्ये केंद्र सरकारची, केंद्र सरकारच्या विधी तज्ञांची मदत घेण्याची गरज आहे. मला चंद्रकांत पाटील यांच्या एवढं ज्ञान नाही पण जेवढं काही आहे त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठवणे हा पहिला कार्यक्रम आहे.
सीरम इन्स्टिट्युटमध्ये कोरोनाची लस टोचून घेतली ही अफवा, शरद पवारांकडून स्पष्टीकरण
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही. एकूण परिस्थिती पाहता मध्यावधी निवडणुका कुणालाच नको आहेत. पण अस्थिरतेमधून मार्ग कसा काढायचा हे पण लक्षात येत नाही. मध्यावधी निवडणूक होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील. पण परिस्थिती बदलली नाही तर पर्याय उरणार नाही, असं चंद्रकात पाटील यांनी म्हटलं होतं.