Swati Mohol : माझा नवरा वाघ होता, मी वाघीण आहे, शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ कडाडली
Sharad Mohol Wife Swati Mohol Reaction : भाजप आमदार नितेश राणे यांनी शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांची भेट घेतली आणि सांत्वन केलं.
पुणे: माझा नवरा हा हिंदुत्ववादी होता, त्यामुळेच त्याची हत्या झाली असल्याचा आरोप कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी केला आहे. माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण असल्याचा उच्चार त्यांनी केला. तसेच शेवटच्या श्वासापर्यंत आपण हिंदुत्ववादासाठी काम करणार असल्याचंही त्या म्हणाल्या.
भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane Meet Sharad Mohol Wife Swati Mohol) यांनी आज स्वाती मोहोळ यांची भेट घेतली. त्यावेळी स्वाती मोहोळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, "सरकार आणि प्रशासनावर आपला पूर्ण विश्वास आहे. कायदा आपल्याला न्याय देईल. आपला नवरा हिंदुत्ववादी होता, हिदुत्ववादासाठी काम करत होता म्हणून त्याची हत्या झाली. समोरच्याला जर असं वाटत असेल की अशा घटनेमुळे मी खचून जाणार तर त्यांना मला एकच सांगायचं आहे, मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे. माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत मी हिंदुत्वासाठी काम करणार."
स्वाती मोहोळ यांनी रविवारी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज आमदार नितेश राणे यांनी स्वाती मोहोळ यांची भेट घेतली.
शरद मोहोळ यांची चुकीची प्रतिमा दाखवली जातेय
भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, "आज कोणतीही राजकीय किंवा अन्य चर्चा न करता मोहोळ कुटुंबीयांचे सांत्वन करायला आलो आहे. शरद मोहोळ यांच्या जाण्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी खचून न जाता काम करावं. पोलीस या प्रकरणाचा योग्य तो तपास करत आहेत."
मोहोळ कुटुंबीयांचे हिंदु समाजासाठी मोठं काम असल्याचं सांगत नितेश राणे म्हणाले की, "शरद मोहोळ यांची जी प्रतिमा दाखवली जाते ती चुकीची आहे, त्या बद्दल मोहोळ कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. शरद मोहोळ गुन्हेगारी क्षेत्रात का आले याची कुणाला माहिती नाही, त्यामुळे त्यांची अशी प्रतिमा केली जात आहे. ती तशी करू नये अशी विनंती मी करतो."
स्वाती मोहोळ भाजपची पदाधिकारी
शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ या भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस आहेत. स्वाती मोहोळ यांनी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एप्रिल 2023 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर शरद मोहोळ राजकारणात एन्ट्री करणार अशीही चर्चा होती. पण त्या आधीच त्याची हत्या करण्यात आली.
ही बातमी वाचा: