Pandharpur Ashadhi Wari 2022: आषाढी वारीसाठी एसटी महामंडळाची जैय्यत तयारी; पुणे विभागातून 510 बसेसची सेवा
यंदाच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने पुणे विभागातून 6 ते 14 जुलै या कालावधीत 530 बसेस सोडण्यात येणार आहेत.
Pandharpur Ashadhi Wari 2022 : आषाढी वारीसाठी राज्यातूनच नाही तर देशभरातील वैष्णवांचा चंद्रभागेच्या काठी मेळा जमण्याची शक्यता आहे. या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागात जय्यत तयारी सुरू आहे. यंदाच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने पुणे विभागातून 6 ते 14 जुलै या कालावधीत 530 बसेस सोडण्यात येणार आहेत.
21 जून रोजी संत ज्ञानेश्वरर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून पंढरपूरकडे तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येत्या 20 जून रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्तान होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांची देहू, आळंदीतच नाही तर पुणे शहरात देखील वारकऱ्यांची गर्दी असते. त्यांच्या वाहतुकीत कोणतीच अडचण येऊ नये म्हणून या सगळ्या परिसरात वारकऱ्यांसाठी 17 जूनपासून 70 बसेस दाखल झाल्या आहेत.
कोरोनाच्या सावटामुळे गेली दोन वर्ष पायीवारी झाली नाही त्यामुळे या वर्षी वारकऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. हिच शक्यता लक्षात घेत यावर्षी सासवड ते पुणे या मार्गावरील प्रवासासाठी 150 बसेस वारकऱ्यांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांचा किंवा भाविकांचा प्रवासाचा प्रश्न सुटणार आहे. या आधी झालेल्या वारीच्या कालावधीत 110 बसेस होत्या मात्र यावर्षी 40 बसेस वाढवण्यात आल्या आहेत.
गावागावातून बससेवा
एका गावातून भाविकांची 40 व्यक्तींची संख्या असेल तर त्या गावातून पंढरपूरकडे बससेवा मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधा एसटीने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे.
गावातील वारकऱ्यांनी एकत्रितपणे बसचे बुकींग केल्यास त्यांना गावातूनच बससेवा मिळणार आहे. 40 व्यक्तींची संख्या यासाठी आवश्यक असून ही बस प्रवाशांना पंढरपूर येथे सोडेल. त्यानंतर तेथून पुन्हा त्यांच्या गावी सोडेल. पुणे विभागातून 6 ते 14 जुलै या कालावधीत 530 बसेस सोडण्यात येणार आहेत. लाखो भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच अधिकारी वर्गही अहोरात्र कार्यरत राहणार आहेत, अशी माहिती पुण्याचे विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणावरे यांनी दिली आहे.