डॉ.प्रदीप कुरुलकर यांची एटीएस कोठडी आज संपणार, पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी एटीएसच्या अटकेत
पुण्यातील डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना जाळ्यात अडकवण्यासाठी पाकिस्तानकडून झारा दास गुप्ता या बनावट नावाने त्यांच्याशी ऑक्टोबर महिन्यापासून संपर्क साधण्यास सुरुवात झाली
DRDO scientist: पाकिस्तानला देशाच्या संरक्षण क्षेत्रातील माहिती देण्याचा आरोप असलेले डीआरडीओचे संचालक यांची एटीएस कोठडी संपत आहे. पुणे सत्र न्यायालयात आज हजर करण्यात येणार आहे. कुरुलकर यानी नक्की कोणती माहिती दिली आणि नक्की कोणता तपास करायचा आहे याची माहिती एटीएसकडून न्यायालयात दिली जाणार आहे.
पुण्यातील डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना जाळ्यात अडकवण्यासाठी पाकिस्तानकडून झारा दास गुप्ता या बनावट नावाने त्यांच्याशी ऑक्टोबर महिन्यापासून संपर्क साधण्यास सुरुवात झाली . सोशल मीडियावर सुरु झालेला झारा आणि प्रदीप कुरुलकर यांच्यातील संवाद पुढे व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुरु झाला. अतिशय खाजगी संवादाबरोबरच कुरुलकर यांना ब्रम्होस क्षेपणास्त्रासह इतरही क्षेपणास्त्रांच्या डिझाइन्सची माहिती विचारली जाऊ लागली हे सगळं संभाषण एटीएसच्या तपासात उघड झाले आहे. कुरुलकर यांच्याकडून कोणती संवेदनशील माहिती शत्रू राष्ट्रांना देण्यात आलीय याचा तपास आता एटीएससह देशातील इतर गुप्तचर यंत्रणा तपास करत आहेत.
डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी ऑक्टोबर महिन्यात हनी ट्रॅपच जाळं टाकलं. त्यासाठी लंडनमधील मोबाईल नंबरचा उपयोग करून प्रदीप कुरुलकर यांच्याशी आधी फेसबुकवरून संपर्क साधण्यात आला. संपर्क साधणाऱ्या महिलेने तीच नावं झारा दास गुप्ता असून ती मूळची पश्चिम बंगालची असल्याचं सांगितलं. पुढे या दोघांमधला संवाद अतिशय खाजगी पातळीवर पोहचला. या संवादरम्यान डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांना डीआरडीओकडून देशातील वेगवगेळ्या प्रयोगशाळांमध्ये सुरु असलेल्या संशोधनाबाबत माहिती विचारली जाऊ लागली. त्याचबरोबर भारतीय बनावटीच्या ब्रम्होस आणि इतर क्षेपणास्त्रांची डिझाइन्स मागण्यात आली . त्याचबारोबर भारत संरक्षण क्षेत्रात इतर कोणत्या देशांसोबत व्यवहार करत आहे याचीही महिती विचारली जात होती.
देशाचा गुप्तचर विभाग अर्थात आयबीच्या हाती कुरुलकर आणि महिला यांच्यातील संभाषण लागलं. या महिलेचा मोबाईल नंबर जरी लंडनमधला असला तरी इंटरनेटचा आय . पी . एड्रेस मात्र पाकिस्तानमधील होता. आयबीने मग हे प्रकरण गांभीर्याने घेतलं. फेब्रुवारी महिन्यात डी आर डी ओ च्या दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पी एम ओ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांना याची कल्पना देण्यात आली . त्यानंतर या प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्याचा निर्णय झाला.
पुण्यातील शनिवार पेठेत वाढलेले प्रदीप कुरुलकर हे 1987 मध्ये डीआरडीओमध्ये रुजू झाले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासह त्यांनी अनेक महत्वाच्या प्रकल्पांवर काम केलं. भारतीय सैन्य दलांना उपयुक्त ठरतील अशा अनेक वस्तू आणि साहित्य तयार करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. डीआरडीओ च्या देशभरातील 53 शाखांमधील साडेपाच हजार शास्त्रज्ञांमधून दहा जणांची डीआर डीओच्या थिंक टँकमध्ये निवड होते. डीआरडीओची संरक्षणविषयक धोरणं आखण्यामध्ये प्रदीप कुरुलकर अशाप्रकारे सहभागी झाले.
प्रदीप कुरुलकर एकीकडे या अशा महत्वाच्या पदांवर काम करत होते तर दुसरीकडे सार्वजनिक कार्यक्रमांमधून व्याख्यानं आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि नागरिकांशी ते संवाद साधत होते. युट्यूब आणि फेसबुकला भारताच्या संरक्षण सज्जतेची माहिती सांगणारे कुरुलकरांचे अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आपलं कुटुंब तीन पिढ्यांसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलं गेल्याचं ते सांगत. संघाच्या घोष विभागात ते हार्मोनियम वाजवण्याचं कामही त्यांनी केलं होतं. मात्र या प्रकारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रदीप कुरुलकरांबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही .
प्रदीप कुरुलकर यांच्यावर राष्ट्रासाठी संवेदनशील असलेल्या माहितीची गोपनीयता भंग केल्याचा आरोप डीआरडीओने दिलेल्या तक्रारीत करण्यात आलाय. एटीएस बरोबरच रॉ आणि इतर गुप्तचर संस्थाही हे प्रकरण संवेदनशील असल्यानं यावर लक्ष ठेऊन आहेत . मागील 36 वर्ष ज्या प्रदीप कुरुलकरांकडे देशाच्या संरक्षण सज्जतेसाठी झटणारा शास्त्रज्ञ म्हणून आदरानं पाहिलं जात होतं. त्याच कुरुलकरांवर देशशी द्रोह केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हनी ट्रॅप भल्या भल्यांची कशी वाट लावतो हे पुन्हा एकदा दिसून आलंय आणि त्याचबरोबर जबाबदार पदांवरील व्यक्तींनी मोबाईल आणि इंटरनेटचा उपयोग किती काळजीपूर्वक करायला हवा हे देखील अधोरेखित झाले आहे.