Sawai Gandharva Mahotsav Pune 2022 : संगीतप्रेमी पुणेकरांसाठी पर्वणी! जाणून घ्या, सवाई गंधर्व महोत्सवात आज काय खास...
Sawai Gandharva Mahotsav : सवाई गंधर्व महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात गायिका मनाली बोस यांच्या गायनाने होणार आहे.
Sawai Gandharva Mahotsav Pune Day 3 : संगीतप्रेमी पुणेकरांसाठी पर्वणी असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवाला (Sawai Gandharva Mahotsav) 14 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. 14 ते 18 डिसेंबरदरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. आज या महोत्सवाचा तिसरा दिवस असून गायिका मनाई बोस यांच्या गायनाने आजच्या दिवसाची सुरुवात होणार आहे.
सवाई गंधर्व महोत्सवात आज काय खास?
सवाई गंधर्व महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात कोलकातास्थित किराणा घराण्याच्या गायिका मनाली बोस यांच्या गायनाने होणार आहे. यांनतर पं. शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र व प्रसिद्ध संतूरवादक राहुल शर्मा यांचे संतूरवादन होईल. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी त्यानंतर आपली गायनकला सादर करतील. तिसऱ्या दिवसाचा समारोप पद्मभूषण पं. अजॉय चक्रबर्ती याच्या गायनाने होईल.
68 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सुरुवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. उपेंद्र भट यांच्या बहारदार गायनाने झाली. त्यानंतर त्यांना वत्सलाबाई जोशी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर पंडित भट यांचे गायन झाले. त्यांनी राग मुलतानीमध्ये 'सोनी बलमा मोरे' या बंदिशीद्वारे आपल्या गायनाची सुरवात केली.
महोत्सावाच्या दुसऱ्या दिवशी दिवंगत पद्मभूषण पं. राजन मिश्रा यांचे बंधू तसेच ख्याल शैलीचे गायक पं. साजन मिश्रा व त्यांचे पुत्र स्वरांश मिश्रा यांचे सहगायन झाले. खास रसिकाग्रहास्तव त्यांनी सादर केलेल्या 'चलो मन वृंदावन के ओर' या भजनाने त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 68 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला भेट देत भारतीय शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेतला. दरम्यान त्यांनी पं. साजन मिश्रा व त्यांचे पुत्र स्वरांश मिश्रा यांच्या गायकीचा आनंद घेतला.
तीन पिढ्या एकाच मंचावर, चार व्हॉइलिन एकाच सुरात
दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात ज्येष्ठ व्हायोलिन वादक विदुषी एन. राजम, त्यांच्या कन्या संगीता शंकर आणि नाती रागिणी व नंदिनी शंकर यांचे व्हायोलिन वादन झाले. तीन पिढीच्या कलाकारांनी सादर केलेल्या दमदार वादनाला रसिकांनी टाळ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी राग दरबारी कानडाद्वारे आपल्या वादनाची सुरूवात केली. स्वरमंचावर चार व्हायोलिन वाजत असूनही जणू काही एकच व्हायोलिन वाजत आहे, असा अनुभव श्रोत्यांना आला. त्यांनी 'माझे माहेर पंढरी...' हा पंडित भीमसेन जोशी यांनी लोकप्रिय केलेला अभंग व्हायोलिनवर सादर केला. 'जो भजे हरी को सदा' या भजनाद्वारे त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला.
भीमसेनजींचं 18 फूट उंचीचे व्यक्तीचित्र खास आकर्षण
यंदाच्या महोत्सवात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी साजरी होत असल्याने एक वेगळीच झळाळी महोत्सवाला लाभणार आहे. याचाच एक भाग म्हणून जुन्या जमान्यातील नामवंत प्रकाशचित्रकार वा. ना. भट यांनी पं. भीमसेनजींच्या तरुणपणी काढलेले तब्बल 18 फूट उंचीचे व्यक्तीचित्र रसिकांना पहायला मिळेल, असेही जोशी यांनी आवर्जून सांगितले.
संबंधित बातम्या