Pune Sawai: पुण्यातील रसिकांना प्रतीक्षा संपली! सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 18 डिसेंबरपासून रंगणार, कलाकारांची सादरीकरण ठरणार ‘सवाई’चे वैशिष्ट्य
Pune Sawai: 70 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सादरीकरण करणाऱ्या कलाकारांची नावे जाहीर झाले आहेत. नवोदित तरीही आश्वासक व दमदार कलाकारांची सादरीकरण ठरणार याही वर्षीच्या ‘सवाई’चे वैशिष्ट्य आहेत.
पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात यंदाच्या वर्षी आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांची घोषणा मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. यंदा महोत्सवाचे 70 वे वर्ष असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे बुधवार दिंनाक 18 डिसेंबर ते रविवार दि. 22 डिसेंबर, 2024 दरम्यान महोत्सव संपन्न होणार आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेवेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद संगोराम, विश्वस्त शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, आनंद भाटे, डॉ प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे हे देखील उपस्थित होते. यावर्षीच्या महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना श्रीनिवास जोशी म्हणाले, “माझे वडील भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी आपले गुरु सवाई गंधर्व यांच्या नावाने सुरु केलेल्या या महोत्सवात आजवर अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. रसिक, जाणकार श्रोत्यांनी देखील महोत्सवावर अपार प्रेम केले. यंदा 70 व्या वर्षात महोत्सव पदार्पण करीत असताना नवोदित तरीही आश्वासक, दमदार कलाकारांना ‘सवाई’ सारखे व्यासपीठ मिळावे, या हेतूने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिग्गज कलाकारांसोबत नव्या दमाच्या कलाकारांचे सादरीकरण महोत्सवात होणार आहे.”
70 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांची यादी खालीलप्रमाणे -
दिवस पहिला (बुधवार दि. 18 डिसेंबर | वेळ दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत)
भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य डॉ. एस बल्लेश व त्यांचे सुपुत्र डॉ कृष्णा बल्लेश यांच्या सुमधुर सनईवादनाने महोत्सवाला सुरुवात होईल. यानंतर किराणा घराण्याचे गायक उस्ताद मुबारक अली खान आणि गायक सुधाकर चव्हाण यांच्या शिष्या व सुपुत्री शाश्वती चव्हाण- झुरंगे आपली गायनसेवा प्रस्तुत करतील. यांनतर आग्रा व जयपूर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक राम देशपांडे यांचे गायन होईल. व्हायोलिन वादक डॉ. एल सुब्रमण्यम यांचे कर्नाटक शैलीतील वादन ऐकण्याची संधी यानंतर रसिकांना मिळेल. पतियाळा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. अजय चक्रबर्ती यांच्या गायनाने पहिल्या दिवसाचा समारोप होईल.
दिवस दुसरा (गुरुवार दि. 19 डिसेंबर | वेळ दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत)
उस्ताद रशीद खान यांचे शिष्य कृष्णा बोंगाणे आणि नागेश आडगांवकर यांच्या सहगायनाने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होईल. बंगळुरूस्थित सुप्रसिद्ध गायिका आणि प्रसिद्ध गायक बसवराज राजगुरू यांच्या शिष्या असलेल्या संगीता कट्टी- कुलकर्णी यांचे गायन यानंतर होईल. प्रसिद्ध सतारवादक बिमलेंदु मुखर्जी यांच्या शिष्या असलेल्या अनुपमा भागवत यांचे सतारवादन यानंतर रंगेल तर पं व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने दुसऱ्या दिवसाचा समारोप होईल.
दिवस तिसरा (शुक्रवार दि. 20 डिसेंबर | वेळ दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत)
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात मोहिनी संगीत समूह यांच्या सादरीकरणाने होईल. यामध्ये सहाना बॅनर्जी (सतार), रुचिरा केदार (गायन), सावनी तळवलकर (तबला), अनुजा बोरुडे- शिंदे (पखवाज), अदिती गराडे (संवादिनी) या आपली कलाप्रस्तुती करतील. यानंतर भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे नातू आणि गायक श्रीनिवास जोशी यांचे सुपुत्र विराज जोशी आपली गायनसेवा रुजू करतील. यानंतर पतियाळा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रबर्ती आणि त्यांचे सुपुत्र रिषित देसिकन यांचे सहगायन संपन्न होईल. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचा समारोप पुरबायन चॅटर्जी यांच्या सतारवादनाने होईल.
दिवस चौथा (शनिवार दि. 21 डिसेंबर | वेळ दुपारी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत)
रघुनंदन पणशीकर यांचे शिष्य सौरभ काडगांवकर यांच्या गायनाने सवाईच्या चौथ्या दिवसाला सुरुवात होईल. यानंतर बंगश घराण्याच्या सातव्या पिढीतील सरोदवादक आणि अमजद अली खान यांचे सुपुत्र अयान व अमान अली बंगश यांची सरोद जुगलबंदी होईल. भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे हे यानंतर आपली गायनसेवा रुजू करतील. यानंतर पं हरीप्रसाद चौरसिया यांचे शिष्य राकेश चौरसिया यांचे बासरीवादन रंगेल. यानंतर सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर याचे गायन होईल. तर पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सांगता होईल.
दिवस पाचवा (रविवार दि. 22 डिसेंबर | वेळ दुपारी 12 ते रात्री 10 वाजेपर्यंत)
महोत्सवाच्या पाचव्या व शेवटच्या दिवसाची सुरुवात मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने होईल. यानंतर शशांक सुब्रमण्यम (बासरी) व आर. कुमरेश (व्हायोलिन) यांचे कर्नाटक शैलीतील सहवादन सादर होईल. यानंतर पं. फिरोज दस्तुर यांचे शिष्य गायक मिलिंद चित्ताळ यांचे गायन संपन्न होईल. प्रतिथयश गायक- संगीतकार अदनान सामी यांचे शास्त्रीय पियानो वादन यानंतर रंगेल. चेन्नईस्थित भरतनाट्यम कलाकार व सुप्रसिद्ध अभिनेत्री शोभना या आपले भरतनाट्यम नृत्य सादरीकरण करतील. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या शिष्यांच्या सहगानाने 70 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा समारोप होईल. या सहगानामध्ये आरती ठाकूर कुंडलकर, अतींद्र सरवडीकर, चेतना पाठक, अश्विनी मोडक यांचा सहभाग असेल.
महोत्सवात पहिल्यांदाच आपली कला सादर करणारे कलाकार खालीलप्रमाणे
शाश्वती चव्हाण- झुरंगे, कृष्णा बोंगाणे, नागेश आडगांवकर, अनुपमा भागवत, सहाना बॅनर्जी, रुचिरा केदार, सावनी तळवलकर, अनुजा बोरुडे- शिंदे, अदिती गराडे, रिषित देसिकन, सौरभ काडगांवकर, अदनान सामी, आरती ठाकूर कुंडलकर, अतिंद्र सरवडीकर, चेतना पाठक, अश्विनी मोडक
कल्याणी समूह, किर्लोस्कर, नांदेड सिटी, पु. ना. गाडगीळ अँड सन्स, केले रिअल्टर्स, रांजेकर रिअल्टी, लोकमान्य मल्टीपर्पज - को ऑपरेटिव्ह सोसायटी, सुहाना आणि आशा पब्लिसिटी आदी प्रायोजकांचे सहकार्य यंदाच्या 70 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास लाभले आहे.