Pune Chandani Chowk Bridge Demolition : चांदणी चौकातील पूल पाडणाऱ्यांंना ते जमलं नाही; पूल बांधणाऱ्या सिव्हील इंजिनिअर आणि डिझायनर सतीश मराठे यांचं मत
पूलासाठी जेवढ्या स्टीलची गरज असते तेवढंच स्टील वापरलं आहे, असं स्पष्टीकरण चांदणी चौकातील पूल बांधणाऱ्या सिव्हील इंजिनिअर आणि डिझायनर सतीश मराठे यांनी दिलं आहे.
Pune Chandani Chowk Bridge Demolition : चांदणी चौकातील पूल बांधण्यासाठी योग्य प्रमाणात स्टीलचा वापर करण्यात आला होता. तर, या पूलासाठी जास्तीचे स्टील वापरलं गेल्याचं इडिफाइस इंजिनिअरींग कंपनीकडून बोललं जात आहे. मात्र, हे खोटं आहे. पूलासाठी जितकी स्टीलची गरज असते, तितकंच स्टील वापरलं आहे, असं स्पष्टीकरण चांदणी चौकातील पूल बांधणारे सिव्हील इंजिनिअर आणि डिझायनर सतीश मराठे यांनी दिलं आहे.
पुण्यातील चांदणी चौकातील पुलावरुन मागील काही दिवस अनेक चर्चा रंगल्या. ठरल्या वेळेत तो पाडलाही गेला. मात्र, चांदणी चौकातील हा पूल पूर्णपणे पडलाच नाही. त्यानंतर अनेक माध्यमांनी पूल पूर्णपणे पडला नसल्याच्या बातम्या केल्या. पूल का पडला नाही, त्यामागची कोणती कारणं होती? किंवा इडिफाईस इंजिनिअर कंपनीचं काय चुकलं? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. मात्र, पूल बांधणाऱ्या सिव्हील इंजिनिअर आणि डिझायनर सतीश मराठे यांनी काही बाबी स्पष्ट केल्या आहेत.
70 टनांचे रणगाडे जातील इतकी पुलाची क्षमता
पुण्यातील चांदणी चौकातील हा पूल 1992 साली PWDच्या मार्फत बांधण्यात आला होता. त्यावेळी पुणेशहराचा विकास फारसा झाला नव्हता. चांदणी चौकातील पूल हा शहराच्या विकासाचा आणि वाहतूकीसाठी महत्त्वाचा ठरणार होता. त्यामुळे हा पूल बांधण्याचं काम बारली या कंपनीकडे सोपवण्यात आलं होतं. सतीश मराठे हे चांदणी चौकातील पूल बांधणारे इंजिनिअऱ होते. चांदणी चौकातील पूल बांधताना मजबूत पूल बांधा, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. त्यावरून एनडीएचे 70 टनांचे रणगाडे जातील, इतकी त्या पुलाची क्षमता ठेवा, असं स्पष्ट सांगण्यात आलं होतं. ते सगळं चित्र डोळ्यासमोर ठेवूनच मी तो पूल डिझाईन केला होता. पूलासाठी लागणारे स्टील योग्य प्रमाणात वापरले गेले आहेत, असंही ते सांगतात.
ते आणि त्यांचे भागीदार मित्र अनंत लिमये यांनी ही कंपनी सुरु केली होती. दोघांंनीही कत्रांट घेण्याचं काम सुरु केलं होतं. 1992 साली केंद्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या पूलाचं कंत्राट त्यांना दिलं होतं. त्यांनी किमान 20 वर्षात किमान 25 पूल बांधले आहेत. त्यात पुण्यात बांधण्यात आलेल्या पूलांची संख्या जास्त आहे. त्यासोबत महाराष्ट्रातील इतर काही शहरातदेखील त्यांनी पूलांचं बांधकाम केलं आहे.
म्हात्रे पूल आणि आळंदीचा पूलही यांनीच बांधला
पुण्यातील म्हात्रे पूल आणि आळंदीचा पूलदेखील या दोघांनीच बांधला होता. काही दिवसांनंतर त्या पूलाच्या कामाबाबत टीकाही झाली. आळंदीचा पूल बांधताना पूलावरुन पाणी जाईल याचा अंदाज होताच. त्याप्रमाणे पूर आला की, तो पाण्याखाली जातो. मात्र, आजपर्यंत त्या पूलाला काहीही झालं नाही, सगळ्या आळंदीकरांसाठी तो तटस्थ उभा आहे. त्यासोबत म्हात्रे पूलाच्या बाजूचा रस्ता खचला तेव्हा पूलाबाबत शंका व्यक्त करण्यात आली होती. मात्र, अजूनही तो पूल उभा आहे. त्यामुळे आम्ही ज्या पूलाचं काम केलं ते अजूनही चांगलेच आहेत आणि मजबूत आहेत, असं ते सांगतात.
हेही वाचा :
Pune Chandani Chowk Bridge PHOTO : चांदणी चौकातला पूल इतिहासजमा; असा पाडला पूल, पूर्ण घटनाक्रम वाचा