शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात बँक ऑफ महाराष्ट्रवर भरदिवसा दरोडा, 1 कोटी 80 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास
Robbery : दिवसाढवळ्या पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावातील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेवर दरोडा पडला आहे.
Pune Bank of Maharashtra Robbery : शिरुर : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावातील बँक ऑफ महाराष्ट्रवर (Bank of Maharashtra) भरदिवसा दरोडा पडल्याने खळबळ उडाली आहे. या दरोड्यात दीड कोटी रुपयांचे दागिने आणि तीस लाख रुपयांची रोकड असा 1 कोटी 80 लाख रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पोलिसांनी दरोडेखोर ज्या दिशेला पळालेत त्याचा अंदाज बांधत अहमदनगर, पारनेर आणि नाशिकच्या दिशेने नाकेबंदी केलीय. दरोडेखोर नाशिकच्या दिशेने पळाले असण्याची शक्यता अधिक असल्याच पोलिसांनी म्हटलंय.
ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दरोडोखोरांनी हे कृत्य केलं आहे. सियाज कारमधून दरोडेखोर आले होते. कानटोप्या घालत आलेल्या दरोडेखोरांनी बँकेवर दरोडा टाकलाय. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांच्या सियाज गाडीवर 'प्रेस' लिहले होते.
दुपारी दीड वाजताच्या सुमारास सियाज कारमधून चार दरोडेखोर बँकेच्या आतमध्ये गेले तर त्यांचा पाचवा साथीदार गाडीमधेच थांबला होता. त्यानंतर त्यांनी पिस्तुलाचा धाकाने बँकेतील कर्मचाऱ्यांकडून 30 लाख रुपये आणि दीड कोटीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. दरोडा टाकल्यानंतर चोर शिरुरच्या दिशेने निघून गेले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बँक ऑफ महाराष्ट्रावर (Bank of Maharashtra) दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोर आधी शिरुरच्या दिशेने गेले. शिरुरमधून पुढे हे दरोडेखोर अहमदनगरच्या दिशेने गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटानस्थाळाकडे धाव घेतली. तोपर्यंत दरोडेखोर लंपास झाले होते. मात्र, मिळालेल्या माहितीच्या आधारावर अहमदनगर, पारनेर आणि इतरही ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख पिंपरखेडला पोहचले आहेत. पुढील तपास सुरु आहे.
आणखी वाचा :
कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून रोज 10 लाख रुपये वसूल करा, पुणे महापालिका उपायुक्तांचे आदेश