Purushottam Karandak Pune: आवाज कुणाचा... ! यंदा एका वर्षात 2 वेळा रंगणार पुरुषोत्तम एकांकीका स्पर्धा
पुरुषोत्तम करंडक या वार्षिक आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेची महाविद्यालयीन नाट्यकर्मींची तयारी सुरू झाली आहे. यंदा प्रथमच पुरुषोत्तम करंडक स्पर्धा एका वर्षात दुसऱ्यांदा होणार आहे.

Purushottam Karandak Pune: आवाज कुणाचा... असा आवाज दोन वर्षांनंतर पुण्यातील विद्यार्थांकडून नाट्यगृहात ऐकायला मिळणार आहे. पुण्यातील सर्वात मानाची आणि मोठी मानली जाणारी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयातील नाट्य मंडळातील विद्यार्थी जोशात कामाला लागल्याचं चित्र आहे. पुण्यात अनेक एकांंकिका स्पर्धा भरवल्या जातात. त्यात पुरुषोत्तम, फिरोदिया, विनोदोत्तम या स्पर्धेसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी विशेष आतुर असतात.
कोरोनानंतर महाविद्यालये यावर्षी नियमित सुरू झाली आहेत. यानंतर पुरुषोत्तम करंडक या वार्षिक आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेची महाविद्यालयीन नाट्यकर्मींची तयारी सुरू झाली आहे. यंदा प्रथमच पुरुषोत्तम करंडक स्पर्धा एका वर्षात दुसऱ्यांदा होणार आहे. दोन वर्षांनी राज्यातील इतर केंद्रांवरही ही स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्रीय कलोपासक पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे आयोजन करते.
स्पर्धेची प्राथमिक फेरी दरवर्षी ऑगस्टमध्ये आणि अंतिम फेरी सप्टेंबरमध्ये होते. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षणतज्ज्ञांसह स्पर्धेचे वेळापत्रकही बदलले. गेल्या वर्षी ही स्पर्धा जानेवारीत झाली होती. सात महिन्यांनंतर ही स्पर्धा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होणार आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी 14 ते 29 ऑगस्ट आणि अंतिम फेरी 17 आणि 18 सप्टेंबर रोजी होईल.
गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जानेवारीमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती, तीही फक्त पुण्यात. त्यामुळे यंदा प्रथमच ही स्पर्धा वर्षातून दोनदा आहे. आता, महाविद्यालये नियमितपणे कार्यरत आहेत, त्यामुळे स्पर्धा कोरोनापूर्व वेळापत्रकानुसार होणार आहे. तसेच ही स्पर्धा राज्यभरातील इतर केंद्रांवरही घेतली जाईल, अशी माहिती महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी दिली आहे.
या स्पर्धेने आतापर्यंत अनेक कलाकार मराठी-हिन्दी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यात सुबोध भावे, तेजस बर्वे, प्रियांका बर्वे, आलोक राजवाडे, सारंग साठे, पर्ण पेठे, गिरीजा ओक यांच्यासारख्या हरहून्नरी कलाकारांचा यात समावेश आहे. येत्या काळात देखील नवे प्रयोग करत महाविद्यालयीन विद्यार्थी मराठी-हिन्दी चित्रपटसृष्टीत या स्पर्धेमार्फत प्रवेश घेतील, अशी अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
