Moosewala Murder Case : पंजाबी गायक मुसेवाला हत्येप्रकरणातील आरोपी सौरव महाकाल अटकेत
Moosewala murder case : सिद्धू यांच्या हत्या प्रकरणातील सौरव महाकालला अटक करण्यात यश मिळाले आहे.
Sidhu Moose Wala Pune Connection : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला ( Sidhu Moose Wala) हत्येप्रकरणातील पुण्यातील आरोपी सौरव महाकाल याला अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. सिद्धू यांच्या हत्या प्रकरणातील सौरवला अटक करण्यात यश मिळाले आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची 29 मे रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यामध्ये एकूण आठ जण सहभागी असल्याचं सांगितलं जात आहे. यातील दोघे पुण्यातील असल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील संतोष जाधव आणि तळेगाव दाभाडे येथील सौरव महाकाल या दोघांची नावे समोर आली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी आता सौरव महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे याला अटक केली आहे. ग्रामीण पोलिसांनी त्याला मोक्काच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
ऑगस्ट 2021 मध्ये मंचर परिसरात ओंकार बानखेले या तरुणाचा खून झाला होता. संतोष जाधव या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. याशिवाय संतोष जाधव याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात 4 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्यावर मोक्कानुसार कारवाई केली आहे. तेव्हापासून तो फरार आहे. दरम्यान सिद्धू मुसेवाला खूनप्रकरणात संतोष जाधव आणि सौरव महाकाल यांची नावे समोर आल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी या दोघांचा शोध सुरू केला होता. त्यानंतर सौरव महाकाळ याला अटक करण्यात आली.
लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली हत्येची जबाबदारी
मानसा जिल्ह्यात रविवारी शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याच्या वेळी मुसेवाला त्यांच्या थार जीपमधून प्रवास करत होते. या हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईक आणि एक मित्र जखमी झाला. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून पंजाब विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र आपचे उमेदवार विजय सिंहला यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे.