पुणेकरांना आता 5 रुपयांत 5 किमी बस प्रवास करता येणार, 'अटल' योजनेची सुरुवात
पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना फक्त पाच रुपयांमध्ये पाच किमीचा बस प्रवास करता येणार आहे. या दोन्ही महापालिकांनी मिळून अटल प्रवासी योजनेची सुरुवात केली आहे.
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना फक्त पाच रुपयांमध्ये पाच किलोमीटरचा बस प्रवास करता येणार आहे. त्यासाठी या दोन्ही महापालिकांनी मिळून अटल प्रवासी योजनेची सुरुवात केली आहे. या दोन्ही शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी पीएमपीएमएल बसेसचा वापर होतो. आता पीएमपीएमएल बसमधून प्रवास करताना पहिल्या पाच किलोमीटरसाठी प्रवाशांना फक्त पाच रुपये मोजावे लागतील. ही योजना राबवता यावी यासाठी पीएमपीएमएलच्या स्पेशल बसेसच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
एअरपोर्टवर प्रवाशांना ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बसेस असतील किंवा एसी बसेस असतील किंवा विशेष स्वरुपात भाड्याने घेण्यात येणाऱ्या बसेस असतील. या बसेससाठी आता इथून पुढे अधिक पैसे मोजावे लागतील आणि स्पेशल बसेसमधून मिळणाऱ्या या पैशांचा उपयोग सर्वसामान्य प्रवाशांना पाच रुपयांमध्ये पाच किलोमीटरचा प्रवास करता यावा यासाठी करण्यात येणार आहे. आज या योजनेचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.
या योजनेचा अधिकाधिक नागरिकांना फायदा व्हावा यासाठी या दोन्ही शहरांमधील सर्व प्रमुख रस्त्यांवर ही योजना राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर उप रस्त्यांवरुन देखील या योजनेसाठीच्या बसेस धावतील. यामुळे या दोन्ही शहरांमध्ये बसने प्रवास करणारे बहुतांश प्रवासी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या योजनेसाठी मिनी बसेसचा उपयोग करण्यात येणार आहे. जेणेकरुन लहान रस्त्यावर देखील या बसेस आरामात धावू शकतील. या प्रत्येक बसच्या आतमध्ये ती बस कोणत्या रस्त्यावर धावणार आहे आणि कोणते बस स्टॉप असणार आहेत याचाही चार्ट असेल. क्यूआर कोडच्या साह्याने आणि ॲपच्या सहाय्याने नागरिकांना याची माहिती मिळवता येईल.
एकीकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचं काम वेगात सुरु असताना दोन्ही महापालिकांनी मिळून या स्वस्तातील बस सेवेची सुरुवात केली आहे. कारण मेट्रो सुरु झाल्यानंतर देखील या मेट्रोला पूरक ठरतील अशा वाहतूक व्यवस्थांची गरज असणार आहे. अटल प्रवासी योजनेकडे त्याचाच एक भाग म्हणून बघितलं जात आहे. पुण्याला दुचाकींचे शहर म्हटलं जातं. देशातील सर्वाधिक दुचाकी पुण्यात आहेत. त्याचबरोबर चार चाकी वाहनांची संख्या देखील मोठी आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मागील काही वर्षांपासून सातत्याने कमकुवत होत गेली. दुसरीकडे या शहरांचा विकास मात्र प्रचंड वेगाने झाला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या रोजच्या कामासाठी स्वतःचं वाहन वापरण्यात शिवाय पर्याय राहिला नाही. याचा परिणाम या दोन्ही शहरांमध्ये वाहतूक कोंडीच्या स्वरुपात पहायला मिळू लागला. शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन प्रवास करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी मोठा वेळ लागू लागला. दिवसेंदिवस पुण्यातील ही वाहतूक कोंडी अधिकाधिक क्लिष्ट होत गेली तर दुसरीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी असलेली पीएमपीएमएल ही कंपनी तोट्यात गेली. मधल्या काळात श्रीकर परदेशी असतील किंवा तुकाराम मुंढे असतील यांच्याकडे या पीएमपीएमएलची जबाबदारी सोपवून पुणेकरांचा त्रास काहीसा कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हे अधिकारी बदलून गेल्यानंतर पुन्हा पीएमपीएमएल पहिल्या सारखीच झाली. मात्र आता या अटल प्रवास योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांनी प्रवास करण्यासाठी या बसेसचा उपयोग करावा यासाठी प्रयत्न होत आहे.
लोक जर पुन्हा बस प्रवासाकडे वळली तर आपोआप खाजगी वाहनांची संख्या कमी होईल अशी अपेक्षा योजना सुरु करताना ठेवण्यात आली आहे. यासाठी या योजनेची रचना वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करण्यात आली आहे. शहरातील सर्व प्रमुख चौकांमधून या योजनेत समाविष्ट असलेल्या बसेस धावतील. त्याचबरोबर बस स्टॉप देखील अशाच प्रकारे निश्चित करण्यात आले की त्यांचं अंतर पाच किलोमीटरहून कमी असेल. या सगळ्याचा कितपत परिणाम होतो हे पाहण्यासाठी सहा महिने वाट पाहावी लागेल, असं पीएमपीएमएलची ही योजना राबवण्याची जबाबदारी असलेले महापालिकेचे अधिकारी राजेंद्र जगताप यांनी म्हटलं आहे. ही योजना फायद्यात राहावी यासाठी ठेकेदाराकडून घेण्यात येणाऱ्या बसेसपेक्षा महापालिकेच्या स्वतःच्या बसेस अधिक संख्येने रस्त्यावरती आणण्याचा देखील प्रयत्न होणार आहे. या योजनेमुळे मुंबईतील बेस्टला जसा मुंबईकर प्रतिसाद देतात आणि बेस्ट मुंबईकरांचा प्रवास जशी सुसह्य करते तसंच चित्र पुण्यात देखील निर्माण होईल ही अपेक्षा आहे.
या योजनेचे उद्घाटन आज झालेलं असलं तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी ही योजना उद्यापासून म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर ती उपलब्ध होणार आहे. येत्या एक ते सव्वा वर्षांमध्ये या दोन्ही महापालिकांच्या निवडणुका देखील आहेत. या निवडणुकांमध्ये या योजनेचा भारतीय जनता पक्षाला फायदा होईल असं भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. येत्या काही दिवसांमध्ये या योजनेमध्ये आणखी बसेसचा समावेश केला जाईल, असंही राजेंद्र जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. आता या योजनेनंतर तरी पुणेकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वळतात का आणि या दोन्ही शहरांमधील वाहतूक कोंडी कमी होते का हे पाहायचं.
PMPML Atal Yojana | पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 'अटल' योजनेचं उद्घाटन