Pune Police : गुन्हेगारांची आता काही खैर नाही; पुण्यात पोलिसांचं आता 'पायी पेट्रोलिंग'
पुण्यात गुन्हेगारीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता सुरक्षेसाठी पायी पेट्रोलिंग करायला सुरुवात केली आहे.
Pune Police : पुण्यात गुन्हेगारीत सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी (Pune Police) आता सुरक्षेसाठी पायी पेट्रोलिंग करायला सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात रोज नवे गुन्हे समोर येत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी पुण पोलिसांकडून अनेक उपाययोजन राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता पुणे पोलिसांनी गाड्यांमधून नाही तर पायी पेट्रोलिंगला सुरुवात केली आहे.
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांचा गुन्हेगारी रोखण्यासाठी हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. पुणे शहरामध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात गर्दीची अनेक ठिकाणं आहेत. या सर्व ठिकाणी गाडी घेऊन पेट्रोलिंग करणं शक्य होत नाही. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी पायी पेट्रोलिंग पोलिसांकडून सुरू करण्यात आलं आहे. पायी पेट्रोलिंगमुळे जनतेशी संवादही साधता येतो आणि गुन्हेगारीलाही आळा बसतोय, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन दिवसाआड पायी पेट्रोलिंग करून जनजागृती करत आहेत. दहशत माजवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
गुन्हेगारी विरोधात पुणे पोलिस अॅक्शन मोडवर
मागील सहा महिन्यांपासून पुण्यात दहशत माजवणाऱ्या गॅंग धुमाकूळ घालत आहे. कोयता गॅंग आणि चुहा गॅंगच्या अनेक आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं आहे. मात्र या गॅंग अजूनही दहशत माजवत आहेत. त्यामुळे पुणे पोलीस चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहेत. कोयता विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. त्यासोबतच अनेक कोयतेदेखील जप्त केले आहेत.
'गुन्हेगार पकडा अन् बक्षिस मिळवा'
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी नवी शक्कल लढवली आहे. कोयता बाळगणार्याला (Koyta Gang) पकडा आणि बक्षीस मिळवा, असं पुणे पोलिसांनी थेट जाहीरच करुन टाकलं आहे. त्यासोबतच हत्यार बाळगणाऱ्या गुंडाना पकडणार्या पोलिसांवरही पोलीस दल बक्षीसांची खैरात करणार आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची दहशत पाहायला मिळत आहे. याच कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
आधार द्या अन् कोयता घ्या
पुण्यात कोणी कोयता खरेदी करत असेल तर आधी आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. पुणे पोलिसांनी हा नियम काढला आहे. काही दिवसांपूर्वी प्रेम प्रकरणातून पुण्यातील नूतन मराठी महाविद्यालयातील अवघ्या 17 वर्षांच्या मुलांनी कोयत्याने हल्ला केला होता. यात पोलिसांनी दोन्ही गटातील तरुणांना अटक केली होती, मात्र कोयता गँगची दहशत कमी कधी होणार? हा प्रश्न पुणेकरांच्या मनात कायम आहे. पुणे पोलिसांनी हे हल्ले रोखण्यासाठी आता कोयता खरेदीसाठी आधारकार्ड सक्तीचं केलं आहे.