Deepak Kesarkar On TET Exam : काही वर्षांनंतर टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांना पुन्हा परीक्षा देता येईल: मंत्री दीपक केसरकर
टी ई टी परिक्षेतील घोटाळ्यात जे दोषी आढळले त्यांना पुन्हा परीक्षा देता येईल. काही वर्षांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली जाईल, असं मत शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी व्यक्त केलं आहे.
Deepak Kesarkar On TET Exam : टी ई टी परिक्षेतील (TET exam) घोटाळ्यात जे दोषी आढळले त्यांना पुन्हा परीक्षा देता येईल. काही वर्षांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली जाईल. मात्र त्याआधी आता जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात (pune) बोलत होते.
केसरकर म्हणाले की, माझ्यात शरीरात एका बापाचे ह्रदय देखील आहे. त्यामुळे मी कोणत्याच विद्यार्थ्यांचं किंवा शिक्षकाचं नुकसान होऊ देणार नाही. पोलिसांच्या चौकशीत जे शिक्षक दोषी ठरले आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल. त्यांना वगळून परीक्षेचा निकाल येत्या काहीच दिवसात जाहीर केला जाईल. मात्र ज्या शिक्षकांनी प्रामाणिकपणे ही परीक्षा दिली आहे त्यांनाही योग्य न्याय मिळेल, असंही ते म्हणाले.
'गृहपाठ बंद होणार नाही'
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद होणार नाही. मात्र पालकांनी विद्यार्थ्यांच्या गृहपाठाकडे लक्ष देण्याची गरज आहे. पालकांंकडून रोज मुलगा गृहपाठ करत आहे का?, हे पाहिलं पाहिजे शिक्षकांबरोबरच पालकांनी देखील मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील 85 टक्के विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि मोफत पुस्तकांचा फायदा होईल. अभ्यासक्रम, वह्या- पुस्तके तीच राहतील. फक्त वह्या पुस्तकाबरोबर जोडण्यात येईल.तिसरीपासून परिक्षा घेतली जाणार का ? यासंदर्भात तज्ञांची समिती याबाबत निर्णय घेईल. मात्र आठवीपर्यंत कोणात्याही विद्यार्थ्याला नापास करण्यात येणार नाही. 0 ते 20 विद्यार्थी असलेल्या शाळा आम्ही बंद करणार नाही मात्र त्या शाळेबाबत तोडगा काढू. प्रत्येक मुलाला शिकताना सोबतीची गरज असते. एका वर्गात एक विद्यार्थी असेल तर त्याचा योग्य विकास होणार नाही. त्यामुळे प्रत्येक मुलाला योग्य आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, याकडे लक्ष देत असल्याचं ते म्हणाले.
'दसरा मेळाव्यात झोपलो नव्हतो'
दसरा मेळाव्यानंतर माझ्याबाबत उद्धव ठाकरे काहीही बोलले तरीही मी काहीही उत्तर देणार नाही, असं मी ठरवलं होतं. मात्र त्यांच्या भाषणात आमच्या आमदारांबाबत आणि सरकारबाबात काहीही टीका केली गेली. त्या मुद्द्याबाबत शिंदे गटाचा मुख्य प्रवक्ता म्हणून देईल. त्यात उद्धव ठाकरेंना कमी लेखण्याची माझी कोणतीही भूमिका नाही. दसरा मेळाव्यात झोपलो नव्हतो, मी विचार करत होतो मी झोपलो असतो तर माझे हात हलले नसते, असं स्पष्टीकरण देखील त्यांनी टीकेवर दिलं आहे.
आदिपुरुष'वर बंदी घालायची का?
'आदिपुरुष'वर बंदी घालण्याची राम कदम यांची मागणी ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. बंदी घालायची की नाही हे ठरवण्यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे. गृहमंत्री त्याबद्दल योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
'डुक्कर ही भाषा संजय राऊतांच्या तोंडी शोभते'
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील वक्तव्यांमुळे मी अस्वस्थ झालो. डुक्कर ही भाषा संजय राऊतांच्या तोंडी शोभते. उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभत नाही. एकनाथ शिंदेंचा मला अभिमान आहे. त्यांच्याबद्दल उद्धव ठाकरे जे बोलले, त्यामुळे अस्वस्थ असल्याचं ते म्हणाले.
'आमदारकीचा हट्ट करणार नाही'
अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेची (शिंदे गटाची) भाजपसोबत युती आहे. त्यांनी जर आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडलं तर एका आमदारकीसाठी आम्ही हट्ट करण्यात अर्थ नाही, त्यामुळे आमदारकीचा हट्ट करणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
संबंधित बातम्या-
Aurangabad: वेतन रोखल्याने टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांची न्यायालयात धाव