Rupali Chakankar : विधवांसाठी 'पूर्णांगी' हा शब्द वापरावा; रुपाली चाकणकरांची राज्य सरकारकडे शिफारस
पतीच्या निधनानंतर पत्नीला विधवा असं संबोधलं जातं. हा शब्द चुकीचा असल्यानं पूर्णांगी हा शब्द वापरावा, अशी मागणी महिला आयोग राज्य सरकारकडे करणार आहे, असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.
Rupali Chakankar : पतीच्या निधनानंतर पत्नीला विधवा असं संबोधलं जातं. हा शब्द चुकीचा असल्यानं पूर्णांगी हा शब्द वापरावा, अशी मागणी महिला आयोग राज्य सरकारकडे करणार आहे, असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे. महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवडमधील दिशा सोशल फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चाकणकरांनी हा मुद्दा मांडला. महिलांना योग्य स्थान मिळावं. त्यांना समाजात नीट वावरता यावं, यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे.
कोरोना काळात 85 हजार पुरुषांच्या मृत्यूची नोंद झाली. म्हणजे माझ्या 85 हजार भगिनी विधवा झाल्या. खरं तर हा शब्द अनेकदा उच्चारावा लागतो आणि हा उच्चार मला नको वाटतो. त्यामुळं राज्य महिला आयोगाकडून विधवा हा शब्द काढून टाकावा अन पूर्णांगी हा शब्द द्यावा, अशी मागणी सरकारकडे केली जाणार आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान होईल असं रुपाली चाकणकरांनी सांगितलं.
दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त चारचौघी या नाटकातील कलावंत, लेखक, दिग्दर्शक यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रातील महिलांच्या सत्कार चिंचवडला आयोजित करण्यात आला होता. यावेळी चाकणकर यांनी सगळ्यांशी संवाद साधला.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, 175 वर्षापूर्वी जोतिबांच्या सावित्रीने स्त्री शिक्षणाचा पाया रचला. दुर्दैवाने सावित्रीमाई आम्हाला कितपत समजल्या, हा प्रश्न आहे. अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी योगदान दिले. लढा दिला मात्र महाराष्ट्र बदलला नाही. आमची वेशभूषा बदलली. घर, गाड्या, रस्ते बदलले. परंतु आमच्यातील माणूस बदलला नाही, ही खरी शोकांतिका आहे. स्त्रियांचे प्रश्न वर्षानुवर्ष कायम आहेत. समाज कितीही पुढारलेला वाटत असला तरी स्त्रियांचे मूळ प्रश्न कायम आहे. आपल्या समाजात मुलींच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करताना आम्ही काटकसर करतो. मात्र हुंड्यासाठी आम्ही कर्ज काढतो. शिक्षण आणि तिचे कर्तृत्व याच गोष्टींना महत्त्व दिले गेले पाहिजे. महिलांना पुरुषांमुळेच त्रास होतो असे नाही तर महिलाच महिलांना त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहे.