Navle Bridge Encrochment : भीषण अपघातानंतर प्रशासनाला जाग; नवले पुलावरील अतिक्रमण कारवाईला सुरुवात
नवले पुलाजवळ रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर अनेक महत्वाचे निर्णय घेणार असल्याचं चित्र आहे. त्याची सुरुवात या परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करत केली आहे.
Navle Bridge Encrochment : पुण्यातील नवले पुलाजवळ रविवारी (20 नोव्हेंबर) रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर अनेक महत्वाचे निर्णय घेणार असल्याचं चित्र आहे. त्याची सुरुवात या परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करत केली आहे. अपघातानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. आज सकाळीच या कारवाईला सुरु केली आहे. 100 पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. या पुलाची रचना चुकली असल्याचं देखील एनएचएआयने मान्य केलं आहे.
कात्रज नवीन बोगदा ते नवले पुल या परिसरात रविवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात किमान 40 गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यानंतर या पुलावर होणारी वाहतूक कोंडी, स्पीड गन या सगळ्याची चर्चा झाली. अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनीही या पुलाची पाहणी केली होती. त्यानंतर या घटनेची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली आणि लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहे.
या पुलाबाबतीत अनेकांनी उपाययोजना सुचवल्या आहेत. त्याचप्रमाणे सातत्याने होणाऱ्या अपघाताबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना यापूर्वी खडसावलं होतं. मात्र यासंदर्भात कोणतंही पाऊल उचललं गेलं नाही. त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं. आतापर्यंत या पुलाने अनेकांचा जीव घेतला आहे. मात्र रविवारी झालेल्या अपघातानंतर प्रशासनाला जाग आली आहे. त्यांनी कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. आज सकाळपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे. यासाठी शेकडो कर्मचारी यांनी कामाला सुरुवात केली आहे. 100 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते.
या पुलावर सातत्याने अपघात होतात. याची महत्त्वाची कारणं समोर आली आहेत. कात्रजच्या नवीन बोगद्यातून धायरी पुलापर्यंत महामार्गाला तीव्र उतार आहे. यामुळे अनेकदा वाहनचालकांचं नियंत्रण सुटतं. एनएचएआय आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यामधे झालेल्या करारानुसार पुणे- ते सातारा दरम्यानच्या महामार्गाचं सहापदरीकरण मार्च 2013 मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं. हे सहापदरीकरण रखडल्याने महामार्ग अरुंद होणं अपघातांना निमंत्रण देणारं ठरत आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहावं, यासाठी दरी पुलाजवळ लावलेल्या स्पीड गनमुळे काही वाहनांचा वेग अचानक कमी होत आहे. मात्र मागून वेगाने येणारी वाहनं वेग कमी झालेल्या वाहनांवर येऊन आदळतात. त्यामुळे अपघात होतात.