Pune BRT News : बीआरटी मार्ग बंद होणार नाही; महापालिका आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं...
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून विकसित करण्यात आलेला बीआरटी मार्ग बंद करणार नाही, असं महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
Pune BRT News : पुण्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून विकसित करण्यात आलेला बीआरटी (BRT) मार्ग बंद करणार नाही, पुण्यातील वाहतूकीसाठी बीआरटीमार्ग महत्वाचा आहे. अनेक रस्त्यांवर बीआरटी वाहतूक सुरळीत सुरु असते, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बीआरटी बंद ठेवणार नाही, असं महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
पुण्यात वाहतूक कोंडीवरुन लेटर वॉर
पुण्यात वाहतूक कोंडीवरुन लेटर वॉर सुरुच आहे. पीएमपीएमएल आयुक्तांनी बीआरटी बंद करु नका, या मागणीचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले होते. काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांनी बीआरटी मार्ग बंद करा, अस पत्र पालिकेला दिले होते. या पत्राला पीएमपीएमलने विरोध केला आहे. प्रवाशांना जलद वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेले कोणतेही बीआरटी मार्ग बंद करू नयेत, अशी मागणी पीएमपीएमएलने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली होती.
वाहतूक कोंडीला बीआरटी जबाबदार?
पुण्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही वर्षांपूर्वी बीआरटी मार्ग उभारण्यात आले होते. या मार्गांमुळे बस प्रवास सोपा झाला होता. शिवाय प्रवासाचा वेळ देखील वाचत होता. मात्र आता याच बीआरटीवरुन लेटर वॉर सुरु झाले आहे. वाहतूक कोंडीला बीआरटी कारणीभूत आहे, असं पुणे पोलीस आयुक्तांनी म्हटलं होतं. वाहतूक कोंडी कमी करायची असेल तर बीआरटी मार्ग बंद करावे लागलीत शिवाय सायकल मार्गदेखील काढून टाकावे लागतील, असं पत्र पोलिसांनी पालिकेला पाठवलं होतं. मात्र याला महापालिकेने आणि पीएमपी प्रशासनाने विरोध केला आहे. बीआरटी बंद होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पीएमपीएमएलची काय भूमिका होती?
पुण्यात वाहतूक कोंडीवर उपाय करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी विविध मार्ग सुचवले होते. त्यात बीआरटी मार्ग बंद करण्याचं पत्र महापालिकेला दिलं होतं. त्यानुसार बीआरटी मार्ग बंद करण्यात येणार होते. मात्र या निर्णयाला पीएमपीएमएलने विरोध दर्शवला होता. त्यांनी थेट महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. बीआरटीमुळे पीएमपीएमएलचं संचलन योग्यरित्या होतं. त्यांच्या वाऱ्यांमध्ये अडथळे निर्माण होत नाही त्यामुळे बीआरटी बंद करु नका, असं त्या पत्रात नमूद केलं होतं. अॅम्बुलन्स, पोलीस वाहने, स्कूल बसेस आणि राज्यपरिवहन महामंडळाकडील बसेस यांना बीआरटी मार्गामधून परवानगी देण्यास हरकत नाही. मात्र बीआरटी मार्गामध्ये अडथळा निर्माण होणाऱ्या इंडस्ट्री बसेस किंवा खाजगी वाहनांना बीआरटी मार्गाचा वापर करण्यास परवानगी देण्यात येवू नये, अशी विनंती त्यांनी केली होती.