Pune News : 45 फूट उंच श्रीराम मंदिराचे कटआऊट; विठ्ठलाचा गजर, मावळमध्ये रंगला दिमाखदार किर्तनमहोत्सव!
पुण्यातील मावळ तालुक्यातील कीर्तन महोत्सवात उभारण्यात आलेल्या राम मंदिराच्या कटआऊटची देखील पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.
मावळ, पुणे : सध्या सगळीकडे राम मंदिराची (Ram temple) चर्चा सुरु आहे. राम मंदिराची रचना पूर्ण होत आली आहे. या दिमाखदार सोहळ्याची जय्यत तयारी देशभर केली जात आहे, त्यातच पुण्यातील मावळ तालुक्यातील कीर्तन महोत्सवात उभारण्यात आलेल्या राम मंदिराच्या कटआऊटची देखील पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.
विठ्ठल परिवार मावळ आणि आमदार सुनिल शेळक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किर्तन महोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती, त्यामुळे या किर्तन महोत्सवाची चांगली चर्चा झाली, सोबतच भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मागील सहा वर्षांपासून धार्मिक सेवाकार्यात कार्यरत असणाऱ्या श्री विठ्ठल परिवार मावळ यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच भव्य दिव्य स्वरुपात किर्तनाचे आयोजन केले होते. पहिल्या दिवशी एकनाथ महाराज चत्तर, दुसर्या दिवशी विशाल महाराज खोले, तिसऱ्या दिवशी बाळु महाराज गिरगावकर, चौथ्या दिवशी योगीराज महाराज गोसावी, तर अक्रुर महाराज साखरे यांचे शेवटच्या दिवशी काल्यानं समाप्ती झाली.
45 फूट उंच श्रीरामाचे कटआऊट
अयोध्येत प्रभु श्रीरामांची प्राणपतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. याच अनुषंगाने कीर्तनस्थळी व्यासपीठावर राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती. तसेच 45 फूट उंच श्रीरामाचे कटआऊट लावले होते. कीर्तन महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी कामशेत बाजारपेठ ते कार्यक्रम स्थळापर्यंत दिंडी काढण्यात आली. यामध्ये प्रभु श्रीराम, सीता,लक्ष्मण,हनुमान,वासुदेव यांची वेशभूषा करण्यात आली होती. भगव्या पताका, टाळ-मृदुंगाचा गजर, विठुनामाचा जयघोषात संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते. याचि देही याचि डोळा असा अनुभव मावळवासियांनी घेतला.
या दिमाखदार सोहळ्याला किमान हजारो भाविकांनी हजेरी लावली. सगळे भाविक राम मंदिराचं रुप पाहून किर्तनात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. मागील सहा वर्षांपासून हा सोहळा आयोजित करीत आहोत. पांडुरंगाच्या नाम स्मरणाने भरलेल्या या वातावरणात सर्व काही विसरुन भाविक मोठ्या आनंदाने सहभागी होतात.यानिमित्ताने सर्वांची मनोभावे सेवा करण्याची संधी मला मिळाली याचे मनस्वी समाधान आहे, आमदार सुनिल शेळके यांनी सांगितलं. सध्या सोशल मीडियाच्या जगात आणि हिवाळा असताना भाविक किर्तनात तल्लीन झाले होते. रोजचं काम काजाचा भार विसरुन विठ्ठलाची आराधना करताना भाविक दिसले. प्रत्येकालाच अयोध्येला जाऊन राम मंदिराचं दर्शन घेणं सध्याच शक्य होणार नाही, त्यामुळे किर्तनाची राम मंदिराच्या देखावा पाहून अनेक नागरिकांनी समाधान मानलं.
इतर महत्वाची बातमी-
शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी वकिलांना कोर्टात आले रडू; म्हणाले आम्ही काहीच केलं नाही