Pune News: पुण्यात खडकवासला धरणाच्या पाण्यावर उभारला जातोय 8 पदरी पूल; कोणत्या गावांना फायदा होणार? A टू Z माहिती
Pune News: खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून मालखेड गावाकडे जाणारा एक महत्त्वाकांक्षी उड्डाणपूल साकारण्यात येत आहे.

Pune News: पुणे रिंग रोडच्या पश्चिम भागात, खडकवासला धरणाच्या (Khadakwasla Dam) पाणलोट क्षेत्रामधून मालखेड गावाकडे जाणारा एक महत्त्वाकांक्षी उड्डाणपूल (Flyover) साकारण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सांगरूण आणि मालखेड या विरुद्ध दिशेच्या गावांना जोडणारा मार्ग उपलब्ध होणार आहे. हा उड्डाणपूल सुमारे 650 मीटर लांबीचा असून तो 8 पदरी असेल. या पुलाचे काम सध्या जोरात सुरू असून, हे काम नवयुगा कंपनीमार्फत करण्यात येत आहे.
Pune News: पाणलोट क्षेत्रात 'पाइल फाउंडेशन'द्वारे उभारणी
या पुलासाठी अत्याधुनिक ‘पाइल फाउंडेशन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये स्टील, काँक्रिट किंवा लाकडाच्या खांबांद्वारे पुलाच्या पाया तयार केला जातो. संपूर्ण पुलासाठी 276 खड्डे घेण्यात येणार असून, त्यापैकी 156 खड्डे जमिनीवर आणि 120 खड्डे पाण्यात खोदले जाणार आहेत. आतापर्यंत पाण्यातील 59 खड्ड्यांचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती या प्रकल्पाचे अभियंत्यांनी दिली आहे.
Pune News: धरणाचे विहंगम दृश्य रिंग रोडवरून
हा पूल केवळ द्रुतगती मार्गाचा भाग असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना त्याचा थेट उपयोग होणार नसला, तरी भविष्यात रिंग रोडवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे भव्य दृश्य अनुभवता येणार आहे. पुलाच्या खांबांमधील अंतर 40 ते 60 मीटर असणार आहे. या भागात एप्रिल 2025 पासून काम सुरू आहे.
Pune News: मार्ग कुठून-कुठे असणार?
पुणे रिंग रोड प्रकल्प पश्चिम आणि पूर्व अशा दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हा प्रकल्प अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा रिंग रोड पुरंदर, हवेली, भोर, खेड, मावळ आणि मुळशी या सहा तालुक्यांतील 82 गावांमधून जाणार आहे.
Pune News: रिंग रोडचा खर्च
या प्रकल्पासाठी एकूण खर्च 55,622.33 कोटी रुपये असून त्यामध्ये
पश्चिम रिंग रोडसाठी : 22,536 कोटी
पूर्व रिंग रोडसाठी : 19,741 कोटी
पूर्व भागाच्या विस्तारासाठी : 13,344 कोटी
असा निधी खर्च होणार आहे.
Pune News: कामांना वेग देण्याचे आदेश
'एमएसआरडीसी'चे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी अलीकडेच पश्चिम रिंग रोडच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामांना अधिक गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
आणखी वाचा
पुण्यातील जैन बोर्डिंगची जागेच्या व्यवहारामध्ये मुरलीधर मोहोळांचा संबंध नाही, कागदपत्रे समोर



















