20 मे पासून दिल्लीतील इंजिनिअर लोणावळ्याच्या जंगलात बेपत्ता, कुटुंबियांकडून शोधणाऱ्याला बक्षीस जाहीर
दिल्लीतील इंजिनिअर तरुण 20 मे पासून लोणावळ्याच्या जंगलात बेपत्ता झाला आहे. चार दिवस होऊनही अद्याप त्याचा शोध न लागल्यामुळे फरहानच्या कुटुंबियांनी शोधणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
पिंपरी चिंचवड : लोणावळा आणि खंडाळ्याच्या जंगलात 20 मे पासून बेपत्ता झालेल्या इंजिनिअर तरुणाचा अजूनही शोध लागलेला नाही. गेल्या चार दिवसांपासून बचाव कार्य करणारी पथकं त्याचा शोध घेत आहेत. परंतु अद्याप त्यांना यश आलेलं नाही. त्यामुळे फरहानच्या कुटुंबियांनी त्याला शोधणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
मूळचा दिल्लीचा रहिवासी असलेला फरहान शाह कामानिमित्त कोल्हापुरात आला होता. दिल्लीला परतण्यापूर्वी त्याने लोणावळ्याचा फेरफटका मारण्याचं ठरवलं. मात्र लोणावळा आणि खंडाळ्याच्या जंगलात फरहान वाट चुकला. 20 मे रोजी दुपारी अडीच वाजता फरहानचा कुटुंबीयांशी शेवटचा संपर्क झाला होता. पुढच्या तीन-चार तासात संपर्क झाला नाही तर माझा शोध सुरु करा असं त्याने कुटुंबीयांना सांगितलं होतं. मात्र फरहानचा अजूनही संपर्क होऊ शकलेला नाही.
फरहान शाह हा लोणावळा आणि खंडाळा सीमेवरील नागफणी सुळक्यावर 20 मे रोजी सकाळी गेला होता. खाली उतरताना नागफणी सुळक्याला अनेक वाटा आहेत. याच वाटांमुळे अनेकदा रस्ता चुकण्याची शक्यता जास्त असते. असाच प्रसंग फरहान शाहवर ओढावला. खाली उतरताना ज्या दिशेला जायचं होतं, त्याच्या विरुद्ध दिशेने तो गेला आणि घनदाट जंगलात अडकला. त्यामुळे तो वारंवार मित्र आणि कुटुंबीयांना याची माहिती देत होता. दिल्लीचा असल्याने त्याचे इथे ओळखीचं नव्हतं. फरहानचं संपर्क तुटल्यामुळे कुटुंबियांनी तातडीने पोलिसांना कळवलं.
पोलिसांच्या फरहान शाहच्या लोकशनवरुन मॅप तयार केला. या नकाशाच्या अनुषंगाने मावळ लोणावळा आणि रायगड जिल्ह्यातील काही बचाव कार्य करणाऱ्या पथकांना याची माहिती दिली. मागील चार दिवसांपासून ही पथकं त्याचा शोध घेत आहेत. परंतु अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही. त्याच्या शोधासाठी ग्रामस्थांचीही मदत घेतली जात आहे. मात्र अजूनही कोणाला यश आलेलं नाही. त्यामुळे आता त्याच्या कुटुंबियांनी फरहानला शोधून काढेल त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देण्याचं जाहीर केलं आहे.