Pune News : सिंहगडावरील इलेक्ट्रिक बस सेवा तात्पुरती स्थगित
सिंहगडावरील अरुंद रस्ता आणि संभाव्य अपघातांचा लक्षात घेता इलेक्ट्रिक बस सेवा काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे.
पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर 1 मेपासून सुरू करण्यात आलेली इलेक्ट्रिक बस स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिनी बस येईपर्यंत आणि रस्त्याचे रुंदीकरण होईपर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
सिंहगड किल्ल्यावर 1 मेपासून इलेक्ट्रिक बस सेवा सुरु करण्यात आली. या बस वगळता इतर वाहनांना किल्ल्यावर प्रवेश बंद करण्यात आलाय. मात्र मात्र शनिवारी आणि रविवारी सिंहगडावर गर्दी झाल्याने बस अपुऱ्या पडल्या. या ई बसमुळे काल (रविवारी) अनेक पर्यटक गडावर अडकून पडले. ई-बसमुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. ई-बसला चार्जिंगसाठी अधिक वेळ लागत असल्याने पर्यटकांना ताटकळत उभं राहावं लागतंय. त्यामुळे ई-बसचा घाट कशासाठी असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. त्याचबरोबर सिंहगडाच्या सर्वात वरच्या बाजूस रस्ते अरुंद असल्याने मोठ्या बसला घाटात वळणे घेण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे घाटातील हे अरुंद रस्ते रुंद करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आल्या आहेत.
तसेच सिंहगडावर जाण्यासाठी आता मोठ्या बसऐवजी लहान बसचा उपयोग करण्यात येणार आहे. रस्ते रुंद होईपर्यंत आणि मिनी बस उपलब्ध होईपर्यंत सिंहगडावरील इलेक्ट्रिक बस सेवा काही कालावधीसाठी स्थगित करण्यात येणार आहे. सिंहगडाचे संवर्धन करण्यासाठी वनविभाग आणि पीएमपी प्रशासनाने ई-बस सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या सेवेला स्थानिकांची प्रचंड विरोध होता.
पर्यावरण रक्षणाच्या हेतूने तसेच गडावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ही बससेवा 1 मे रोजी अजित पवार यांच्या हस्ते सुरू करण्यात आली होती. या साठी येथील खासगी वाहनांना गडावर बंदी करण्यात आली होती. यामुळे स्थानिक नागरिकांचा रोजगार बुडाला होता. यासाठी या सेवेला स्थानिकांचा सुरूवातीपासूनचा विरोध होता. त्यात रविवारी चार्जिंग नसल्याने या बस गडावर बंद पडल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली होती. स्थानिकांनी ही बस बंद करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले होते. त्यांनी या निवेदनावर स्वाक्षरी करत ही सेवा स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.