(Source: Poll of Polls)
Pune News : ना डीजे, ना रॅली, पुणेकरांकडून महापुरुषांना हटके आदरांजली; फुले- आंबेडकर जयंंतीनिमित्त शेफ विष्णू मनोहर तयार करणार 10 हजार किलोची मिसळ
पहिल्यांदाच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांची जयंती पुणेकरांनी हटके पद्धतीने साजरी करण्याचा निर्धार केला आहे.
Pune News : महापुरुषांची जयंती आपण अनेक पद्धतीने साजरी केल्याचं पाहिलं आहे. कधी डिजे लावून धिंगाणा केला तर कधी मोठ मोठे कार्यक्रम आणि रॅली आयोजित करुन शक्ती प्रदर्शन केल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र पहिल्यांदाच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांची जयंती पुणेकरांनी हटके पद्धतीने साजरी करण्याचा निर्धार केला आहे. दोन्ही महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी पुणेकरांच्या सहभागातून तब्बल दहा हजार किलोची मिसळ बनविण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाच हजार किलो तर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पाच हजार किलोची मिसळ तयार करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर हे मिसळ बनवणार आहेत. या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने 11 एप्रिल आणि 14 एप्रिल रोजी गंज पेठेतील महात्मा ज्योतिबा फुले वाडा आणि पुणे रेल्वे स्टेशन रस्ता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ही मिसळ तयार करण्यात येणार आहे. अभिवादन करण्यासाठी येणा-या बांधवांना मिसळ वाटप करण्यात येणार आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आहे. 11 एप्रिल 2023 रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले वाड्यात हजार किलो मिसळ आणि 14 एप्रिल 2023 सकाळी 7 वाजेपासून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे 5 हजार किलो मिसळ तयार करून वाटप करण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
किती सामुग्री लागणार?
उपक्रमामध्ये 10 हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी 1000 किलो, कांदा 600 किलो, आलं 200 किलो, लसूण 200 किलो, तेल 700 किलो, मिसळ मसाला 260 किलो, लाल मिरची पावडर 50 किलो, हळद पावडर 50 किलो, मीठ 40 किलो, खोबरा कीस 140 किलो, तमालपत्र 10 किलो, फरसाण 2400 किलो, पाणी 8000 लिटर, कोथिंबीर 100 जुडी हे साहित्य वापरण्यात येणार आहे.
पुणेकरांचं हटके अभिवादन....
पुणेकरांनी कोणताही नव्याने सुरु केलेला उपक्रम हा समाजातील इतरांकरीता आदर्श ठरत असतो. त्यामुळेच यंदा आगळ्या - वेगळ्या पद्धतीने लोकसहभागातून 10 हजार किलो मिसळ तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे. लोकसहभाग असला की कितीही मोठी अवघड गोष्ट ही अगदी सहज मार्गी लागते, अशी हजारो उदाहरणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत या समाजात पहायला मिळतात. याच धर्तीवर लोकसहभागासाठी लोकांनी एकत्र येण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.