मास्कचा गैरवापर करत पत्नीची मालमत्ता हडपली, महिलेच्या मदतीने बायकोची पॉवर ऑफ अॅटर्नी स्वत:च्या नावावर
पुण्यातील एका व्यक्तीने मास्कचा गैरवापर करत त्यांनी पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता स्वतःच्या नावावर केली. या इसम पत्नीऐवजी दुसऱ्या महिलेला मास्क घालून नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयात घेऊन गेला आणि तिच्यामार्फत सगळी मालमत्ता स्वतःच्या नावावर करुन घेतल्याचं समोर आलं आहे.
पुणे : कोरोनामुळे मास्क घालणं सगळ्यांना बंधनकारक आहे. परंतु याचा गैरफायदा उठवत पुण्यातील एका व्यक्तीने पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता स्वतःच्या नावावर केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या इसम पत्नीऐवजी दुसऱ्या महिलेला मास्क घालून नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयात घेऊन गेला आणि तिच्यामार्फत सगळी मालमत्ता स्वतःच्या नावावर करुन घेतल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंद करुन तपास सुरु केला आहे.
कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण करणारा मास्क हा जणू आपल्या चेहऱ्याचा एक भाग बनला आहे. पण याच मास्कचा उपयोग फसवणुकीसाठी केला जाईल अशी कोणी कल्पनाही केली नसेल. परंतु पुण्यातील कविता जाधव यांच्या नावावर असलेली सगळी मालमत्ता मास्कचा गैरवापर करुन हडपण्याचा प्रयत्न झाला आहे, तो देखील त्यांच्या पतीकडून. कविता जाधव आणि त्यांचे पती राहुल जाधव हे दोघे पुण्यातील कात्रज भागात राहतात. कविता यांच्या नावावर एक फ्लॅट आणि एक दुकान आहे तर दोन फ्लॅट हे कविता आणि त्यांचे पती राहुल यांच्या सामायिक मालकीचे आहेत. मागील वर्षी जुलै महिन्यात कडक लॉकडाऊन असताना राहुल जाधव यांनी पत्नीच्या नावावर असलेली ही सगळी मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्याचा डाव आखला. त्यासाठी एका दुसऱ्याच महिलेला मास्क घालून ते नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयात घेऊन गेले आणि बायकोची पॉवर ऑफ अॅटर्नी त्यांनी स्वतःच्या नावावर करुन घेतली. त्यासाठी बायकोची खरी कागदपत्र त्यांनी वापरली. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे नोंदणी आणि मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रांवर असलेल्या फोटोमधील व्यक्तीच आपल्याकडे नोंद करण्यासाठी आली आहे का हे पाहिलंच गेलं नाही.
याच पावर ऑफ अॅटर्नीचा उपयोग करुन राहुल जाधव यांनी 14 जून रोजी पत्नीच्या नावावर असलेली सगळी मालमत्ता स्वतःच्या नावावर केली. नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयातून कविता जाधव यांना जेव्हा त्यासाठी नोटीस पाठवण्यात आली तेव्हा त्यांच्या लक्षात हा सगळा प्रकार आला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीकडे त्यांनी मदतीसाठी त्यांनी धाव घेतली आणि मग हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचलं.
मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचा कोणताही व्यवहार होताना नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयात दोघांचेही फोटो घेतले जातात. या कार्यालयातील रेकॉर्डची छाननी केली असता कविता जाधव यांच्या नावाने व्यवहार करणारी महिला वेगळीच असल्याच फोटोंमधे स्पष्टपणे दिसत आहे. मात्र फोटो काढण्यापुरता काही सेकंदांसाठी मास्क खाली घेण्यात आल्याने आपल्या ध्यानात ही गोष्ट आली नाही असं इथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच या प्रकरणात नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयातील कोणी कर्मचारी सहभागी आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.
कविता जाधव यांनी झाल्या प्रकाराबद्दल पोलीस स्टेशन गाठल्यावर त्यांचे पती राहुल जाधव यांनीही अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. स्वतः राहुल जाधव याबाबत काहीही बोलण्यास तयार नसले तरी त्यांच्या वकिलांनी ते निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
कोरोनाच्या काळात मास्कचा उपयोग करुन वेगवेगळ्या शहरात अनेक गुन्हे घडल्याचं आतापर्यंत उघड झालं आहे. मात्र मास्कचा उपयोग करुन कोट्यवधी रुपयांची सगळी मालमत्ताच हडप करण्याचा प्रकार सर्वांनाच सावधानतेचा इशारा देणारा आहे. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी मास्कच्या मागे असलेल्या चेहर्याची खातरजमा करण किती गरजेचं आहे हेच यातून दिसून येत आहे.