Pune Bypoll election : 'माझा कुठे पक्षाने विचार केला, तेव्हा मी पक्षाचा विचार का करू'; कॉंग्रेसच्या बाळासाहेब दाभेकरांनी केली कसब्यातून बंडखोरी
माझा कुठे पक्षाने विचार केला, तेव्हा मी पक्षाचा विचार का करू, असं मत कसब्यातून बंडखोरी करणारे कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर यांनी व्यक्त केलं आहे.
Pune Bypoll election : माझा कुठे पक्षाने विचार केला, तेव्हा मी पक्षाचा विचार का करू, असं मत कसब्यातून बंडखोरी करणारे कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर (Balasaheb dabhekar) यांनी व्यक्त केलं आहे. कसब्यातून (Kasba Bypoll Election) महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बाळासाहेब दाभेकर म्हणाले की, मी बंडखोरी करणार असं माहित झाल्यावर कॉंग्रेसचे नेते माझ्याकडे समजवण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी मला पक्षाचा विचार करण्याला सल्ला दिला. त्यावेळी मी त्यांना स्पष्ट सांगितलं की पक्षाने माझा विचार केला नाही तर मी पक्षाचा विचार का करु. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. काहीही झालं तरी मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही. मी चाळीस वर्ष पक्षाचं काम करत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कार्यकर्त्यांचा जल्लोष, 'बाळासाहेब दाभेकर तुम आगे बढो'च्या जोरदार घोषणाबाजीत पुणे शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर यांनी आज कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दाभेकर काँग्रेसकडून इच्छुक होते परंतु पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
आज सकाळी नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिरातील गणरायाच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते सजवलेल्या फुलांचा जीपमध्ये बसून कार्यकर्त्यांच्याबरोबर दुचाकी वाहनांच्या रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली नंतर केसरीवाडा येथे आली. केसरीवाड्यातील गणपतीचं दर्शन घेतले. त्यानंतर शैलेश टिळक यांची सदिच्छा भेट घेतली. यानंतर ही रॅली केळकर रस्त्याने आप्पा बळवंत चौक मार्गे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात पोहोचली. या ठिकाणी आरती केल्यानंतर रॅलीने त्यांनी शिवाजी रस्त्याने गणपती कला क्रीडामंच येथे येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
बंडखोरीचा भाजपला फायदा होणार?
रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दाभेकरांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आणि उमेदवारी अर्जही दाखल केला. त्यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं बघायला मिळालं. या आघाडीतील बिघाडीचा फायदा भाजपला होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र टिळकांना उमेदवारी न दिल्याने या मतदार संघात ब्राह्मण समाज नाराज झाल्याच्या देखील चर्चा आहे. त्यामुळे टिळकांना उमेदवारी नाकारल्याने भाजपला फटका बसणार की महाविकास आघाडीत फूट पडल्याने भाजपला फायदा होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.