(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NCRB Report Pune : पुण्याचा विषयच खोल! देशात पुणे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात सुरक्षित शहर तर मुंबई सहाव्या क्रमांकावर; एनसीआरबीचा अहवाल
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात पुणे हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर असल्याचे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
NCRB Report Pune : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अहवालात पुणे हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर असल्याचे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेल्या काही मुख्य कारवाईमुळे गुन्हेगारीचं प्रमाण कमी झालं आहे. मोक्का कारवाया, एमपीडीएनुसार स्थानबद्धता, रायझिंग गँगचा बीमोड, अल्पवयीन गुन्हेगारांच्या समुपदेशनामुळे पुण्याला भारतातील दुसऱ्या क्रमांकांचं सर्वात सुरक्षित शहर म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या 2021मध्ये पुणे शहर देशात दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर म्हणून स्थान मिळवलं आहे. यात मुंबई मात्र सहाव्या क्रमांकावर असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पुण्यात वर्षभर राबवण्यात आलेले गुन्हेगारीला आळा बसणारे मोहीम आणि त्याचं अवलंबन सगळ्यात महत्वाची बाब ठरली आहे. महिलांच्या सुरक्षेसह कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पुण्यात राबविण्यात आलेला अभिनव उपक्रम फायदेशीर ठरला आहे.
मोक्का कारवाया आणि दामिनी पथक
कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी पोलीस ठाण्यांमार्फत अनेक परिसरातील सराईत गुंड आणि गॅंगची माहिती घेण्यात आली होती. त्यांची पार्श्वभूमी लक्षात घेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात पोलिसांना वारंवार यश आलं. मोक्का कारवाईमुळेदेखील शहरातील गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे शहरात गुन्हेगारीला आळा बसला. शिवाय महिलांसाठी दामिनी पथक उभारण्यात आला होता. अनेक ठिकाणी किंवा शाळा-महाविद्यालयांमध्ये लैंगिकतेबाबत किंवा इतर विषयांबाबत समुपदपेशन करण्यात आलं होतं. या समुपदेशनामुळे अनेकांनी जुने प्रकरणं सांगितले. त्यामुळे गुन्हेगाराला गजाआड करण्यात पोलीसांना मदत मिळाली. त्यामुळे गुन्हेगारीचा आलेख घसरला.
कोलकाता शहर पहिल्या क्रमांकावर
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या ताज्या अहवालानुसार कोलकाताने आपल्या प्रति लाख लोकसंख्येतील सर्वात कमी दखलपात्र गुन्हे असलेल्या शहरांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. 2021 मध्ये हे महानगर भारतातील सर्वात सुरक्षित शहर बनले आहे. दखलपात्र गुन्ह्यांच्या संख्येनुसार शहराने प्रति 1-लाख लोकसंख्येमध्ये 103.4 गुण मिळवले, पुण्याच्या पुढे कूच केले, जे दुसऱ्या क्रमांकावर (256.8) आणि हैदराबाद (259.9) होते, अशा माहिती आहे. कानपूर (336.5), बेंगळुरू (427.2) आणि मुंबई (428.4) या यादीत इतर शहरांचा समावेश आहे.
पाच शहरांमध्ये दिल्लीचा समावेश नाही
या सुरक्षित असलेल्या पाच शहरांमध्ये भारताची राजधानी दिल्ली शहराचा समावेश नाही आहे. गुन्ह्यांची संख्या कोलकातामध्ये 103.4 पुण्यात 265.8, हैदराबादमध्ये –259.9, कानपूरमध्ये –336.5, बंगळुरुत – 427.2,मुंबईत – 428.8 अशी आहे. मात्र या यादीत दिल्लीच्या नावाचा सामवेश नाही आहे.