Pune : ललित पाटीलला पुण्याबाहेर पळवण्यात रोझरी स्कुलच्या विनय अरहानाचा हात, 46 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा अन् त्याचेही ससूनमध्ये उपचाराचे नाटक
Lalit Patil Drugs Case : रोझरी स्कुलचा संचालक विनय अरहाना याने त्याच्या गाडीतून ललित पाटीलला पुण्याचा बाहेर काढलं आणि त्याला पैसे दिल्याचं समोर आलं आहे.
पुणे: ललित पाटीलला (Lalit Patil) मदत केल्याबद्दल रोझरी स्कुलचा (Rosary Education Society) संचालक विनय अरहाना (Vinay Aranha) याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. विनय अरहाना हा देखील उपचाराच्या नावाखाली ललित पाटील असलेल्या 16 नंबरच्या वॉर्डमध्ये होता. त्यानेच ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केल्याचं आता समोर आलं आहे.
ड्रग माफिया ललित पाटील पुण्यातील ससुन रुग्णालयातील (Sasoon Hospital Drug Racket) कैद्यांसाठीच्या 16 नंबर वॉर्डमधे उपचारांच्या नावाखाली बंद होता. याच ठिकाणी रोझरी स्कुलचा संचालक विनय अरहाना अटकेत होता. विनय अरहाना याच्यावर एका सहकारी बँकेची 46 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. तोही याच 16 नंबर वॉर्डमध्ये उपचारांच्या नावाखाली बंद होता. दोघांची 16 नंबर वॉर्डमधे एकमेकांशी ओळख झाली होती आणि त्यातुन विनय अरहानाने ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केली.
ललित पाटील ससुन रुग्णालयातून 2 ऑक्टोबरला निसटल्यानंतर आधी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला आणि तिथून सोमवार पेठेत पोहचला. तिथे विनय अरहाना याचा ड्रायव्हर दत्ता डोके हा कार घेऊन तयार होता. दत्ता डोकेने ललित पाटीलला पुण्याच्या बाहेर रावेतपर्यंत सोडले आणि स्वतः जवळचे दहा हजार रुपये देखील ललितला दिले. हे सगळे त्याने विनय अरहानाच्या सांगण्यावरून केले.
ललित पाटील प्रकरणाचा गाजावाजा झाल्यानंतर विनय अरहानाला पुन्हा येरवडा कारागृहात हलवण्यात आले होते. पुणे पोलिसांनी न्यायालयाकडून त्याचा ताबा मिळवून त्याला अटक केली असून त्याची चौकशी करण्यात येणार आहे.
नाशिकमध्ये एक कार जप्त, माजी महापौर अडचणीत?
ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा अनेक बड्या राजकीय नेत्यांचा संपर्क असल्याचे आरोप प्रत्यारोप राजकीय वर्तुळात होत असताना अशातच नाशिक पोलिसांनी एका वाहन चालकाची चौकशी केली आहे. नाशिक (Nashik) शहरातील एका पक्षाच्या मोठ्या नेत्याचा हा वाहनचालक आहे. ललितच्या अपघातग्रस्त कारची (Accidental Car) दुरुस्ती करण्यासाठी संबंधित वाहनचालकाने मध्यस्थी केल्याचे समजते आहे. त्यामुळे नाशिकमधील माजी महापौर पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
बहुचर्चित ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणाची पाळेमुळे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागापर्यंत पसरली असून मुंबई पोलिस पथकाने (Mumbai Police) देवळा (Deola) तालुक्यातील सरस्वती वाडी येथून तब्बल 15 किलो ड्रग्ज हस्तगत केले. ललित पाटीलने पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा चालक सचिन वाघ याच्या मदतीने लोहोणेर येथे गिरणा नदीपात्रात ड्रग्जच्या 12 किलोच्या आठ बॅगा फेकल्याने त्याचाही शोध मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी सुरु केला. दोन टप्प्यात तब्बल 14 तास मोहीम राबवली.
त्यानंतर आता नाशिकच्या एमडी ड्रग्जप्रकरणी गुन्हे शाखेकडून एका माजी महापौराची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समजते आहे. ललित पाटीलची जुनी गाडी या नेत्याकडे होती. मात्र, प्रकरण अंगलट येत असल्याने ही गाडी रातोरात सात वर्ष जुनी दाखवली गेल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे संबंधित नेत्याचे धाबे दणाणले आहेत.
ही बातमी वाचा: