पुण्यातील डॉक्टर बनला देवमाणूस; ड्राईव्हिंग सीटवर बसून वाचवले कोरोना रुग्णाचे प्राण
पुण्यातील एका कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णाच्या मदतीला डॉक्टर वेगळ्या पद्धतीने धावून आले आहेत. एका रुग्णाला अॅम्बुलन्समध्ये नेण्यासाठी डॉक्टरांनी अॅम्बुलन्स चालकाची भूमिका बजावली.
पुणे : पुण्यातील एका डॉक्टरने ड्रायव्हर बनून एका कोरोना रुग्णाचे प्राण वाचवल्याची घटना घडलीय. डॉक्टर रणजीत निकम असं ड्रायव्हर बनलेल्या या डॉक्टरांचे नाव आहे. डॉक्टर रणजीत निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून पुण्यातली कात्रज भागात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर कोविड सेंटर चालवलं जात आहे. या सेंटरमध्ये असलेल्या एका रुग्णाला सोमवारी रात्री दोन वाजता अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्या रुग्णाचं वयही जास्त असल्यामुळे त्याला तातडीने उपचारांची गरज होती. श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्या रुग्णाला कृत्रिम पद्धतीने ऑक्सिजन देणे आवश्यक होते. त्यामुळे रात्री काम करणाऱ्या कोरोना सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी त्या रुग्णाला तातडीने ऑक्सिजन बेडची सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये हलवायचं ठरवलं.
मात्र त्या कोरोना सेंटरसाठी काम करणारा ॲम्बुलन्स ड्रायव्हर त्यादिवशी थंडी आणि तापामुळे आजारी पडला होता. तर दुसरा ड्रायव्हर घरी गेला होता. कोरोना सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी 108 क्रमांकावर फोन करून अॅम्बुलन्स मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. वेळ आणीबाणीची होती. कोरोना रुग्ण असलेल्या 71 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला तातडीने उपचार मिळणे गरजेचं होतं. रुग्णाच्या घरातील इतर व्यक्तीही कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे आयसोलेशनमध्ये होते आणि अॅम्बुलन्सची सोय करण्यासाठी कुणीही उपलब्ध नव्हतं. त्यामुळे मागचा पुढचा विचार न करता त्यावेळी रुग्णांवर उपचार करत असलेल्या डॉक्टर रणजीत निकम यांनी स्वतः ॲम्बुलन्स चालवायचं ठरवलं.
रुग्णाला ॲम्बुलन्समध्ये बसवण्यात आलं. ऑक्सिजन सिलेंडर देखील ॲम्बुलन्समध्ये सोबत घेण्यात आला आणि डॉक्टर रणजीत निकम यांनी रात्री अडीच वाजता अॅम्ब्युलन्स बाहेर काढली. त्यानंतर शोध सुरू झाला तो ऑक्सिजन बेडचा. त्यासाठी डॉक्टर निकम यांना पुण्यातील अनेक मोठ्या हॉस्पिटलचा नकार पचवावा लागला. रुग्णाला घेऊन डॉक्टर रणजीत निकम हे पुण्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ऑक्सिजन बेड मिळेल का याची चौकशी करत होते. मात्र त्यांना बेड उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येत होतं. अखेर काही तासांच्या प्रयत्नानंतर पूना हॉस्पिटलमध्ये त्यांना ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि त्यांनी अॅम्बुलन्समधील त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती केलं. त्यानंतर त्या रुग्णाला ऑक्सिजनची सुविधा पुरवण्यात आली आणि आता त्या रुग्णाची परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पूना हॉस्पिटलकडून सांगण्यात आलंय.
आतापर्यंत अनेक रुग्णांवर उपचार केले, अनेक प्रसंग पाहिले परंतु हा प्रसंग आपल्यासाठीही वेगळा होता, असं डॉक्टर रणजीत निकम यांनी म्हटलं. आपल्याकडे असलेल्या कारला पॉवर स्टेरिंग आहे आणि आपल्याला तशाच प्रकारची गाडी चालवण्याचा आत्तापर्यंत अनुभव होता. परंतु ॲम्बुलन्स चालवणं हे खूप वेगळं होतं पण रात्रीच्या वेळी आपण रुग्णासाठी हा धोका पत्करायचं ठरवलं असं डॉक्टर रणजीत निकम यांनी म्हटलं. रणजीत निकम हे पुण्यातील पर्वती भागात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी त्यांचा दवाखाना चालवतात. त्याचबरोबर पुण्यातील इतर झोपडपट्ट्यांमध्येही ते रुग्णांवर उपचार करण्यासाठी जात असतात. त्यांच्या या कामामुळे अनेक संस्था त्यांच्या कामाला हातभार लावण्यासाठी पुढं येत असतात.