Yavat : दौंडजवळच्या यवतमध्ये दोन गटात राडा, सोशल मीडियावरील पोस्टमुळे तणाव, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Daund Yavat News : ज्या व्यक्तीच्या सोशल मीडिया पोस्टमुळे हा तणाव निर्माण झाला त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

पुणे : दौंड तालुक्यातील यवतमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर शुक्रवारी दुपारी बारानंतर यवतमधील दोन गट आमनेसामने आले. यवतमध्ये घडलेल्या या घटनेनंतर शुक्रवारचा आठवडी बाजार बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे यवतमध्ये काही दुचाकी गाड्या पेटवून देण्यात आल्या असल्याची माहिती आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला यवत पोलिसांनी ताब्यात घेतलं असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
यवतमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली असली तरी गावातील महिला आणि लहाण मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आहे.
पोलिसांचं अपयश?
एका व्यक्तीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनंतर गेल्या चार पाच दिवसांपासून यवतमध्ये तणाव होता अशी माहिती समोर येत आहे. त्यानंतर गावामध्ये काही बैठकाही झाल्याची माहिती आहे. या सगळ्याची माहिती पोलिसांना कशी लागली नाही असा सवाल विचारला जात आहे. त्यामुळे यवतमध्ये निर्माण झालेला तणाव म्हणजे पोलिसांचे अपयश असल्याचा सांगितलं जातंय.
Sandeep Gill Clarification : पोलीस नेमकं काय म्हणाले?
दरम्यान, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी एबीपी माझाशी संवाद साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. यवत गावात आज जी घटना घडली, ती एका सोशल मीडिया स्टेटसमुळे घडली. फेसबुक आणि व्हाट्सअॅप स्टेटस लावण्यात आलेला होता. एक तरुणांने हे आक्षेपार्ह स्टेटस लावल्यामुळे हा प्रकार घडला. ज्यावेळी पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली, त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलीस स्टेशनला घेऊन गेले मग नंतर त्याच्यावर कारवाई सुरू केली.
पोलिसांनी गावातील प्रतिनिधींची मीटिंग घेतली होती. परंतु त्यादरम्यान आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. गावात तणाव होता, लोक रस्त्यावर आले होते. मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आमची पेट्रोलिंग त्या ठिकाणी चालू होती, ज्या ज्या ठिकाणी काही तणावची परिस्थिती होती, त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी तणाव दूर केला. आता गावात पूर्णपणे शांतता आहे आणि कुठलाही प्रकारचा जमाव कुठे नाही. पोलीस बंदोबस्त आणि पोलीस पेट्रोलिंग चालू आहे.
सर्व नागरिकांनी शांतता राखावी, कायद्याचं उल्लंघन करु नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन संदीप गिल यांनी केलं.
























